जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने बंद; घरपोच सेवा न मिळाल्याने पुन्हा गर्दीची शक्यता

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी  टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करून  करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पनवेल पालिका प्रशासनाने बाजारपेठांमधील दुकानांवरून थेट खरेदी बंद केली आहे. त्याऐवजी दुकानदारांना घरपोच सेवा देण्याचा प्रयोग राबवा, अशा सूचना सोमवारी सायंकाळी केल्याने दुकानदारांनी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला, मासळी वा मटण-चिकनसारख्या  वस्तू इतक्या कमी वेळेत नागरिकांना पुरवणे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केले. टाळेबंदीआधी दोन दिवस नागरिकांनी खरेदी केलेल्या जीवनावश्यक वस्तू आता संपत आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी पालिका नेमका कोणता पर्याय खुला करणार की पुन्हा गर्दीलाच आमंत्रण दिले जाणार, हा पेच उपस्थित झाला आहे.

पनवेल पालिकेने ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून दहा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्याआधी नागरिकांना दोन दिवसांत जीवनाश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या काळातही काही ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अत्यावश्यक सेवेतील किराणामाल आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील, असे जाहीर केले. तीन दिवसांनी आयुक्तांनी कठोर टाळेबंदीचा पवित्रा घेतला. यात किराणामालाची दुकानांवरून थेट विक्री करण्यास मनाई केली. याशिवाय भाजीपाल्याच्या थेट विक्रीस बंदी घातली. त्याऐवजी या मालाची घरपोच सेवा देण्याचा हुकूम सोमवारी सायंकाळी काढला. त्यामुळे नागरिकांना मंगळवारी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मिळाली नाही.

‘दि होलसेल र्मचट असोसिएशन’चे अध्यक्ष दिनेश मिराणी यांच्यासह ५० घाऊक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. यानंतर पनवेल व्यापारी संघाच्या ३०० किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

‘कालावधी वाढवू नका’

भाजीपाला नाशवंत आहे. तरीही करोनाकाळात तो पुरविण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे. ३५०च्या आसपास  सभासद रोजबाजार संघात आहेत. अनेक दुकानदारांचे ग्राहक ठरलेले आहेत.  यात काही भाजी विक्रेते भाजीपाल्याची घरपोच सेवा देत आहेत. यात १५ ते २० टक्के शेतमाल वाया जाण्याची शक्यता आहे. आठवडाभर हा प्रयोग राबवता येईल. मात्र, टाळेबंदीच्या कालावधीत  वाढ केल्यास भाजीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यावसायिक सहकारी विक्रेता संघ रोजबाजारचे अध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी व्यक्त केली.

खारघरमधील आस्थापनांवर दंडात्मक कारवाई

जीवनावश्यक वस्तूंची थेट दुकानांवरून खरेदी करण्यास पनवेल  महापालिकेने सोमवारी सायंकाळपासून निर्बंध घातल्यानंतर खारघर वसाहतीतील ‘प्रभाग-अ’मधील दोन आस्थापनांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे आस्थापना व्यवस्थापक आणि ग्राहकांची धांदल उडाली. खारघरमधील स्मार्ट पॉइंट आणि अ‍ॅपल केमिस्ट अ‍ॅण्ड स्टोअर्स या दोन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात पालिकेने १३ हजार १०० रुपये दंडाची रक्कम जमा केली. खारघर विभागाचे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी अतिक्रमण शुल्क लावून दुकानदारांवर ही कारवाई केली. त्यामुळे खारघरमधील सर्व दुकाने बंद होती.

कमी चाचण्यांमुळे संसर्गात वाढ

पालिकेने वेळोवेळी केलेल्या घोषणांमधील संभ्रमामुळे अनेकांनी अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, असे गृहीत धरून आठवडाभराच्या मालाची साठवणूक केली नाही. त्यामुळे मंगळवारपासून अनेक जण किराणामाल, भाजीपाल्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, अनेक दुकाने बंद होती. यात खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि तळोजा या वसाहतींत कठोरटाळेबंदी सुरू केली. पोलिसांनी मंगळवारी सकाळी वसाहतींत गस्त घालण्यास सुरुवात केली. पालिका क्षेत्रात सुमारे १६ ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली. काही भागांत पोलिसांनी सकाळी सुरू केलेली दुकाने पुन्हा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे राज्यातील इतर शहरे टाळेबंदीतून मुक्त होत असताना पनवेल शहरात नागरिकांच्या हालचाली बंद करण्यात येत आहेत. वेळीच रुग्णशोध मोहीम न राबविल्याने  संसर्ग वाढल्याने ही वेळ आल्याचे मत  व्यक्त केले जात आहे.

पनवेलमधील नागरिक संतप्त

नवी मुंबई : पनवेल शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येमुळे समाजमाध्यमाद्वारे हा संताप व्यक्त केला जात आहे. पनवेलची करोनाबाधित संख्येने तीन हजारांचा आकडा पार केला असून ग्रामीण भागात ही संख्या वाढू लागली आहे.पनवेल शहर व तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. पनवेल हे शहर रायगडमधील अनेक तालुक्यांसाठी जवळचे शहर असल्याने जिल्ह्य़ातील रुग्णांची भिस्त संपूर्ण पनवेल शहरावर आहे. त्यामुळे पालिकेवर दुहेरी ताण पडत आहे. जिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात  रुग्णांवरील उपचाराची सोय करण्यात आली आहे. याशिवाय काही खासगी रुग्णालयांमधील खाटा पालिकेने भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. दिवसाकाठी दीडशेपर्यंत रुग्णसंख्या जात होती. टाळेबंदीनंतर हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, शहरातील संपूर्ण व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील रहिवाशी संतप्त झाले आहेत.