‘बेस्ट’ दरकपातीचा ‘नवी मुंबई परिवहन’ला तोटा; प्रवासी संख्येतही घट
पालिकेच्या अनुदानावर सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन सेवेला ‘बेस्ट’ दरकपातीचा फटका बसू लागला आहे. ‘एनएमएमटी’ला आताच दिवसाला सरासरी तीन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. बेस्ट आणि ‘एनएमएमटी’च्या तिकीट दरात मोठी तफावत राहत असल्याने प्रवासी संख्याही घटत आहे. नवी मुंबईतही ‘बेस्ट’चे प्रवासी वाढले असल्याचे ‘बेस्ट’ उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोमाने यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकूलित आणि साध्या ४१५ बसेस ७५ मार्गावर दररोज १,२६,६९९.२ कि.मी. धावत आहेत. यामध्ये वातानुकूलित बसचे ११ मार्ग तर साध्या बसचे ६४ बस मार्ग आहेत. दररोज साधारणपणे २ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु डिझेल दरवाढीमुळे आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने ‘एनएमएमटी’ला पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात आता ‘बेस्ट’च्या तिकीट दरकपातीची भर पडली आहे.
‘बेस्ट’चे १८ मार्ग नवी मुंबईत असून ‘बेस्ट’ची बस नवी मुंबई पालिका क्षेत्र व कळंबोलीपर्यंत सेवा देत आहे. यातील बहुतांश मार्ग हे ‘बेस्ट’ आणि ‘एनएमएमटी’च्या समांतर आहेत. यापूर्वी ‘बेस्ट’पेक्षा ‘एनएमएमटी’चे तिकीट दर कमी होते. त्यामुळे मुंबईतील मार्गावरही ‘एनएमएमटी’ प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळत होते. मुंबईत बोरिवली, मंत्रालय, बांद्रा, अधेरी, मुलुंड, ताडदेव या मार्गावर ‘एनएमएमटी’ची सेवा असून दररोज ११ लाखांचे उत्पन्न येत होते. वातानुकूलित बसला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र आता ‘बेस्ट’ दरकपातीचा परिणाम जाणवू लागला असल्याने आताच पालिका अनुदानावर सुरू असलेला हा उपक्रम कसा चालवायचा याची चिंता प्रशासनाला सतावू लागली आहे.
महिन्याला एक कोटीचा तोटा?
एनएमएमटीचे दररोज प्रवास प्रवासी २ लाख १० हजार इतके होते. बेस्ट दर कपातीमुळे आता साधारण १ लाख ९७ हजार प्रवासी मिळत आहेत. म्हणजे दहा ते बरा हजार प्रवासी कमी दिसू लागले आहेत. तर यापूर्वी दिवसाचे तिकिटातून मिळणारे ३८ लाख रुपयांचे उत्पन्न आता ३५ लाखांपर्यंत आले आहे. म्हणजे दिवसाला तीन लाख व महिन्याला सुमारे एक कोटीचा तोटा सहन करावा लागणार आहे.
बेस्टने घेतलेल्या तिकीट दरकपातीच्या निर्णयाची दोन दिवसांपूर्वीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम ‘एनएमएमटी’च्या उत्पन्नावर दिसत आहे. तरीदेखील अजून आठ दिवसानंतर संपूर्ण आढावा घेत ‘एनएमएमटी’च्या तिकीट दराबाबत योग्य तो विचार करण्यात येईल.
– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका