पनवेल – शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जिल्ह्यातील विकासाबद्दल भाष्य करताना सरकारवर टीका केली. त्याचबरोबर छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार कसे सुरू असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारवर तोफ डागली.
नवीन पनवेलमध्ये शनिवारी झालेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला. राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्री मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, मात्र राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांना मराठी शिकवण्याची जबाबदारी घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यांनी रायगड जिल्हा राज्यातील सर्वाधिक जमीन विक्री होणारा जिल्हा आहे याकडे लक्ष वेधले. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडे जात आहेत, आणि त्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना काम मिळत नाही, हे दुर्दैवी आहे.
रायगडसारखा ऐतिहासिक जिल्हा उद्ध्वस्त होईल
रायगडकरांनो सतर्क राहा ! एक मराठी माणूस या भूमीवरच दडपला गेला तर त्याचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा, जमीन आणि रोजगार या तिन्ही पातळ्यांवर होणारा परप्रांतीय हस्तक्षेप आणि राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष यावर त्यांनी तीव्र टीका केली. विकासाच्या नावाखाली स्थानिक संस्कृती, भाषा आणि रोजगार उध्वस्त करणाऱ्यांवर सरकारने जर जबाबदारी घेतली नाही, तर रायगडसारखा ऐतिहासिक जिल्हा उद्ध्वस्त होईल, अशी तीव्र भावना राज ठाकरे यांनी मांडली.
तसेच आजारी असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगून शेकापच्या जयंत पाटील यांच्याविषयीचा स्नेह व्यक्त केला. तसेच भगव्या आणि लाल विचारधारांच्या ऐतिहासिक संमेलनाची आठवणीचे दाखले उपस्थितांना करून दिले.
स्थानिक मराठी तरुणांनाच नोकऱ्या
शेकापने रायगडचे नेतृत्व स्वीकारून ही स्थिती बदलण्याचे आवाहन करताना राज ठाकरे यांनी चेतावणी दिली की, जर हे असेच सुरू राहिले, तर मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहील, आणि ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक मराठी तरुणांनाच नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भागीदारीची मागणी करा, नाहीतर…
गुजरातच्या भूमी कायद्यांचा दाखला देत तिथे परराज्यातील व्यक्तींना थेट शेतजमीन विकत घेता येत नाही. मग महाराष्ट्रात अशीच अट का नाही, जर गुजरातचे नेते त्यांच्या राज्याचा विचार करत असतील, तर आम्ही आमच्या मातृभाषा आणि मातृभूमीचा विचार केल्यास ते संकोचित कसे, ठरवता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतजमिनी परराज्यातील खरेदीदारांनी घेतल्यास त्यांच्याकडे भागीदारीची मागणी करा, नाहीतर पुढे जाऊन आपल्या भागात अमराठी लोकांचेच आमदार, खासदार निवडून येतील,” अशी भिती त्यांनी मराठी माणसाला सावधानतेची इशारा देताना व्यक्त केली.
त्यावेळेस फक्त जिवंत प्रेत शिल्लक राहतात
महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसाची परप्रांतियांमध्ये ‘विकत घेतली जाणारा समाज’ अशी ओळख असल्याचे ठाकरे म्हणाले. हिंदप्रांतावरती तब्बल सव्वाशे वर्षे राज्य केलेल्या प्रांताबाबत परप्रांतिय असे मत व्यक्त करणे हे सर्वात धोकादायक असल्याचे ठाकरे म्हणाले. मराठी माणसे त्यांची भाषा, जमीन असे सर्व सोडून द्यायला तयार होत असेल तर थोरपुरुषांचे पुतळे आपण सजावट म्हणून ठेवायचे का, याच गोष्टी थोर पुरुषांनी शिकवल्या का. पारशी शब्द या राज्यात असू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्दकोष काढून मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच राज्यातील माणसे स्वाभिमानशुन्य होतात त्यावेळेस फक्त जिवंत प्रेत शिल्लक राहतात असेही ठाकरे म्हणाले.
जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार कसे ?
जिल्ह्यातील अनधिकृत डान्सबार सुरू असण्यावरून शासनाच्या निष्काळजीपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात डान्सबार बंद झाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार कसे सुरू राहतात, याकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
विकास होत असताना राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्यास तो प्रदेश बरबाद होतो आणि रायगड जिल्हा हा त्यापैकी एक असल्याचे त्यांनी सांगीतले. एकीकडे शेतक-यांच्या जमिनी खरेदी करायच्या आणि अमराठी बार मालकांकडून जमिनी विक्रीतून आलेल्या शेतकऱ्यांकडून पिळवणूक करायची अशा दुहेरी कचाट्यात रायगडचा शेतकरी अडकला आहे.