पालघर: राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या तुफान वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक प्रवाशांनी आता सफाळे ते विरार दरम्यानच्या रो-रो सेवेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेवर विद्युत वाहिनी तुटून रेल्वे सेवा विस्कळीत झाली असताना देखील अधिकतर नागरिकांनी रो रो सेवेचा लाभ घेतला. यामुळे त्यांचा वेळ वाचत असून प्रवासही सुखकर होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मनोर ते खानिवडे व वसई विरार दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने इंधनाचा अपव्यय वेळेचा अपव्यय होतो तर मानसिक त्रासही वाढतो.
या वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी या दृष्टीने अनेक प्रवासी खाजगी वाहनातून महामार्गाने प्रवास न करता सफाळे ते विरार दरम्यान असलेल्या रो रो सेवेचा लाभ घेत आहेत. सफाळे ते विरार दरम्यान सुरू झालेली रो-रो सेवा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरली आहे. या सेवेमुळे वाहनांसह प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि सहज व कमी वेळेत पोहोचू शकतात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली असून प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळाली आहे.
ही सेवा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असून तिचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचेही दिसून येत आहे. रो-रो सेवेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात अशा आणखी सेवा सुरू झाल्यास शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
अंतर व वेळेची बचत
खारवाडेश्री ते नारंगी असे रस्ते मार्गे अंतर ६० किलोमीटर असून त्याला दीड तासांचा कालावधी लागतो. हा प्रवास जलमार्गाने केल्यास दीड किलोमीटर चे अंतर असून त्याकरिता साधारण १५ मिनिटांच्या कालावधी लागणे अपेक्षित आहे. या रो-रो सेवेमुळे विरार, वसई तसेच सफाळे, केळवे परिसरातील स्थानिक नागरिकांना, पर्यटकांना व दैनंदिन प्रवाशांना दोन तालुक्यांमधून ये-जा करणे सुलभ झाले आहे. विरार येथून जिल्हा मुख्यालयाला पोहोचण्यासाठी रस्ते मार्गे लागणारे ७० किलोमीटरचे अंतर निम्म्यावर येणार असून त्यामुळे इंधन व वेळेची बचत होत आहे.
पश्चिम रेल्वे वरील बिघाडा दरम्यान रोरो चा वापर
मुंबई कडून अजमेर कडे जाणारी अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने १९ जून रोजी ६.४५ दरम्यान विद्युत तारा गाडीवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळी मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या व गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या अनेक जलद व उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी विरार वरून सफाळे येथे येण्यासाठी व जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी रोरो सेवेला प्राधान्य दिले. तर एसटी प्रशासनाकडून देखील सफाळे रेल्वे स्थानकातून जलसार रोरो जेटी पर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीकरिता रात्री १० वाजता बंद होणारी रोरो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे विरार येथून सफाळे व सफाळे येथून विरारकडे जाणाऱ्या अधिकतर नागरिकांनी रोरो जेटीचा वापर केला.