कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत माजी आमदार के. पी. पाटील यांनी विधानसभा सर करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील यांच्यासह ४ माजी आमदारांच्या जोरावर या निवडणुकीत सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने विरोधकांचे पानिपत केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन खासदार, एक आमदार अशी मोठी ताकत असतानाही विरोधकांचे परिवर्तन घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. या निवडणुकीचे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे.

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २५ जागांसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. एकमेकांचे सगे सोयरे विरोधात उभे राहिल्याने निवडणुकीला राजकीय महाभारताचे स्वरूप आले होते. जिल्ह्यातील तमाम बडे नेते मोठ्या ताकतीने निवडणुकीत उतरल्याने निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सर्वच जागा जिंकून सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवला तर विरोधकांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला परिवर्तन घडवण्यात अपयश आले.

हेही वाचा : नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ?

नेटक्या नियोजनाचे यश

या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीची घोषणा होण्याआधीच माजी आमदार के. पी. पाटील यांचे दाजी मेहुणे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए . वाय. पाटील हे विरोधकांच्या छावणीत दाखल झाले होते. पाटील यांची राधानगरी तालुक्यात मोठी ताकद असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे विरोधी आघाडीला बळ प्राप्त झाले होते. ए. वाय. पाटील यांच्या गावातच मते कमी मिळाळ्याने त्यांच्या राजकीय शक्तीचा भ्रमाचा भोपळा फुटला गेला. याउलट सत्ताधाऱ्यांनी आक्रमक तितकेच नेटकी प्रचार यंत्रणा उभी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कल्पकतेने लावलेल्या जोडण्या विजयाच्या दिशेने घेऊन गेल्या. विरोधकांकडे नेते अधिक पण पुरेशा समानव्याचा अभाव ठळकपणे दिसला. भावी अध्यक्ष कोण हा वाद रंगला. फुटून आलेले ए. वाय. पाटील कि सत्ताकांक्षी आमदार आबिटकर यांची बंधू अर्जुन यांच्यातील अध्यक्षपदाच्या मतभेदाची चर्चा प्रतिकूल मत बनवण्यास कारणीभूत ठरली. परिणामी या दोघांसह कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खराटे यांच्यासह प्रमुखांवर तब्बल ५ हजाराहून अधिक मताधिक्यांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली.

हेही वाचा : मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष

चंद्रकांतदादांना फटका

बिद्री हा माझ्या गावाजवळचा कारखाना आहे. के. पी. पाटील यांची तेथे मनमानी सुरू आहे. बिद्रीतील भ्रष्टाचाराची चौकशी लावली जाईल, अशा पद्धतीची धडाकेबाज विधाने मंत्री चंद्रकांत पाटील प्रचारादरम्यान करत होते. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी या भागात तळ ठोकला होता. परंतु त्यांच्या या मांडणीला सभासदांनी बिलकुल प्रतिसाद दिला नाही. बिद्री कारखान्यांने उसाला दिलेल्या दर, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधाया बाबी समाधानकारक तर होत्याच पण जिल्ह्यातील काही कारखाने गैरकारभारात अडकले असताना त्याची चौकशी न करता चांगल्या कारखान्याची चौकशी करण्याचे चंद्रकांत पाटील यांच्या विधानातील गुणात्मक फरक सभासदांच्या लक्षात आला. दादांना त्यांच्या खानापूर या गावातील सत्ता राखता आली नाही . याच गावाशेजारचा कारखाना ताब्यात मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याने हा पराभव चंद्रकांत पाटील यांना धक्का देणारा ठरला.

हेही वाचा : रोहित पवार यांच्या यात्रेत अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतील एकजुटीचे चित्र

केपींना वाढते बळ

बिद्री कारखाना हा उसाला राज्यात सर्वाधिक दर देणारा आहे. कारखान्याचा सह वीज निर्मिती प्रकल्प उत्तम चालला आहे. इथेनॉल निर्मिती प्रकल्पाला अल्पकाळात गती मिळाली आहे. हा आलेख पाहता सभासदांनी कारखान्याच्या कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवावे असे दुर्गुण नव्हते. तरीही केवळ सत्ताकांक्षेपोटी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवडणूक लादली. कारखान्याचे विशेष लेखा परीक्षणासाठीही प्रयत्न केले. हसन मुश्रीफ यांच्या तगडे राजकीय बळ लागल्याने ही चौकशी होऊ शकली नाही. शिवाय, सभासदांनीही बिद्रीचा लय भारी कारभार या के. पी. पाटील यांनी चालवलेल्या घोषवाक्याला पाठिंबा देत भरगोस विजय मिळवून दिला. हा विजय के. पी. पाटील यांना आत्मविश्वास देणारा तर ठरलाच खेरीज राधानगरी विधानसभा निवडणुकीसाठी पोषक बनला.

हेही वाचा : पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात स्वपक्षीयांचीही नाराजी !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या कारखान्यांचेच वाभाडे

बिद्री कारखान्याचा कारभार कसा भ्रष्टाचारी आहे यावर विरोधकांचे टीकास्त्र सुरू होते. पण त्याला तितक्याच बेडरपणे भिडताना के. पी. पाटील यांनी विरोधकांच्या गंडस्थळावर प्रहार केले. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यानंतर शाहू कारखाना कसा कमकुवत झाला आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या नंतर हमिदवाडा कारखान्याची कशी दुरावस्था झाली आहे याचा पाढा त्यांनी वाचाला. सभासदांनाही कोणता कारखाना अधिक सक्षमपणे चालला आहे हे ओळखून मतदान केल्याने सत्ताधाऱ्यांच्या विमानाने यशाला गवसणी घातली तर विरोधकांची कपबशी खळकन फुटली.