01 October 2020

News Flash

Coronavirus : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

रुग्णांची संख्या वाढता कामा नये असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बीष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली. “पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील,” असं पवार यावेळी म्हणाले.
“कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल,” असे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले, “ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून २५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत.”

कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घाला

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच रॅपीड टेस्टमार्फत देखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा,” असंही पवार म्हणाले

मोबाईल व्हॅनद्वारे तपासणीवर भर द्या

“पोलीसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. तसेच पोलीसांना एन-९५ मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे धान्य वितरण सुयोग्य व सुनियोजीत करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचीत राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी,” अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सहकारी संस्थांनी अर्थसहाय्य करावं

“कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यासाठी मार्केट कमिट्या, सहकारी संस्थांनी पुढे यावे आणि अर्थ सहाय्य करावे,” असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

प्राचार्यांना उपस्थित राहू द्या

“शैक्षणिक दृष्टया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे,” अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. तसेच कोविड -19 सेवा देणाऱ्या खाजगी रुग्णालयांना शासनाने मदत करावी, अशी सूचनाही राज्यमंत्र्यांनी बैठकीत केली असता निश्चितच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 7:14 pm

Web Title: deputy chief minister ajit pawar orders lockdown should be strictly follow in next 8 days pune pimpri chinchwad svk 88 jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus  : दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६८ नवे रुग्ण
2 मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
3 पत्नीशी भांडण केले तर विलगीकरण
Just Now!
X