पुणे शहर, जिल्ह्य़ांत ७३५ कोटींची थकबाकी

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत वीज देयकांची थकबाकी पुन्हा वाढली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील एकूण थकबाकी ७३५ कोटींवर पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांत ९ लाख ९० हजार वीजग्राहकांनी वीज देयकांचे तब्बल ३९४ कोटी २२ लाख रुपये थकविले असून सद्य:स्थितीत या वर्गवारीतील २८ लाख ५५ हजार ग्राहकांकडे एकूण १३५९ कोटी ४ लाखांची थकबाकी झाली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात मार्चअखेर लघुदाब वर्गवारीच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १८ लाख ६५ हजार ५० ग्राहकांकडे ९६४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र एप्रिल व मे महिन्यांत वीजबिलांचा भरणा न झाल्यामुळे २८ लाख ५५ हजार वीजग्राहकांकडे ही थकबाकी १३५९ कोटी चार लाखांवर गेली आहे. पुणे जिल्ह्य़ात ७३५ कोटी ९५ लाख, सातारा जिल्ह्य़ात ७७ कोटी ७३ लाख, सोलापूर जिल्ह्य़ात १८८ कोटी ४८, सांगली जिल्ह्य़ात १२१ कोटी ४१ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात २३५ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेच्या आणि तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र राबले आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने महावितरणची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून वीजबिलांचा आणि थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू आणि थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.