पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावला.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २६ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीवर गाडेने बलात्कार केला. बलात्कार करून पसार झालेल्या गाडेला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली होती. गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गाडेने या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून गुरुवारी युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील अजय मिसार, पीडित तरुणीची वकील श्रीया आवले यांनी गाडे याच्या जामीन अर्जास विराेध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. काही महत्त्वाचे पुरावे तपासात मिळाले. विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय, तांत्रिक तपास करण्यात आला. त्याचा सहभाग निश्चित झाला असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये,’ असे ॲड. मिसार यांनी युक्तिवादात सांगितले. आरोपीने पीडित तरुणीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी आणि आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता, असे ॲड. आवले यांनी युक्तिवादात नमूद केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गाडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.