महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात एक जाहीर सभा घेणार होते. त्याबाबत सभेच्या ठिकाणासाठी चाचपणी केली जात होती. राज ठाकरे स्वत: सभेच्या ठिकाणाबाबत घोषणा करणार होते. पण आज ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे सभा लांबणीवर पडली आहे. यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. दरम्यान ही सभा रद्द होणार असल्याबाबतही बोललं जात होतं.

याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडभरात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं की, राज ठाकरे यांच्या सभेसाठी डेक्कन येथील नदी पात्रातील जागा मिळावी, याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र हवामान विभागाने २३ तारखे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचं काम देखील सुरू आहे. अशात जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आम्ही नदी पात्रातील ठिकाण रद्द केलं असून आम्हाला अन्य तीन ठिकाणांची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणाबाबत राज ठाकरे उद्या स्वतः जाहीर करतील. या आठवड्याच्या शेवटी ही सभा होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द होणार नाही” असंही वागसकर म्हणाले.