पिंपरी : विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देणार असल्याचा दावा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शाळा सुरू होऊन १५ दिवस झाल्यानंतरही केवळ १५ हजार विद्यार्थ्यांनाच साहित्याचे वाटप केले आहे. अद्यापही ४३ हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत. साहित्य वाटप १५ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून, यामध्ये ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे (डीबीटी) पैसे दिले जात होते. मात्र, पालकांच्या खात्यावर दिलेल्या पैशांतून विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केली नसल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षापासून निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादारांकडून शालेय साहित्य खरेदी केले जाते. हे साहित्य वितरित करण्यासाठी थेट लाभ हस्तांतर पद्धतीअंतर्गत ‘ई-रूपी’ या नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला आहे.
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑगस्टपर्यंत शालेय साहित्य मिळाले नव्हते. यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, तो फोल ठरला. महापालिकेच्या शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या आहेत. गेल्या १४ दिवसांत १५ हजार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप झाले आहे.
कशी आहे ई-रूपी प्रणाली?
थेट लाभ हस्तांतर ‘ई-रूपी’ पद्धतीअंतर्गत शालेय साहित्याच्या वितरणासाठी पालकांच्या मोबाइल क्रमांकाची संबंधित शाळेत नोंद होते. बँकेमार्फत या मोबाइल क्रमांकावर क्यूआर कोडशी संबंधित लिंक असलेला संदेश पाठविण्यात येतो. या लिंकद्वारे मोबाइलमध्ये क्यूआर कोड तयार करण्यात येतो. शालेय साहित्य पुरवठादाराने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पालकांच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी जातो. हा ओटीपी पालकांनी पुरवठादारास सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळते.
कोणत्या वस्तूंचा समावेश?
शालेय साहित्यामध्ये दप्तर, बूट, मोजे, खेळाचे बूट, कंपास पेटी, फूटपट्टी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्याक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, पाण्याची बाटली आदी साहित्यांचा समावेश आहे.
शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. वितरकांकडून आतापर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. येत्या १५ जुलैपर्यंत साहित्य वाटप पूर्ण होईल. -तानाजी नरळे, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य दिले जात आहे. ई-रूपीसारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा होत आहे. एकही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका