लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: माहिती-तंत्रज्ञान कंपनीतून पहाटे रिक्षातून घरी निघालेल्या संगणक अभियंता महिलेवर रिक्षाचालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. संगणक अभियंता महिलेने त्वरित या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन रिक्षाचालकाला पकडले.

अनिकेत नानासाहेब मुंजाळ (वय २४, रा. सध्या रा. शिवचैतन्यनगर, फुरसुंगी, हडपसर, मूळ रा. उंबरे, माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत संगणक अभियंता महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ती कामावरुन घरी निघाली होती. माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात रिक्षाचालक मुंजाळ थांबला होता. संगणक अभियंता महिलेने मुंजाळला सोडण्यास सांगितले.

हेही वाचा… पुणे: देशातील पहिल्या ओमिक्रॉन बूस्टर लशीची पुण्यात निर्मिती

त्यानंतर मुंजाळ महिलेला रिक्षातून घेऊन निघाला. मुंजाळने रिक्षा चुकीच्या मार्गाने नेल्याचे महिलेचे लक्षात आले. तिने त्याला घराकडे रिक्षा नेण्यास सांगितले. काळेपडळ परिसरात रेल्वे फाटकाजवळ निर्जन ठिकाणी त्याने रिक्षा थांबविली. त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने धक्काबु्क्की केली. प्रसंगावधान राखून महिलेने त्वरित या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. वानवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. महिलेने विरोध केल्याने रिक्षाचालक मुंजाळ पसार झाला. पोलिसांनी पाठलाग करुन मुंजाळला पकडले. मुंजाळच्या विरुद्ध बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested rickshaw driver who attempted rape on computer engineer woman in pune print news rbk 25 dvr
First published on: 21-06-2023 at 16:08 IST