पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) राज्यात एकीकडे हिंदी पट्ट्यातील शिक्षकांची संख्या वाढत असताना, देशभरातही ही परीक्षा हिंदीतून देणाऱ्यांची संख्या वाढून तीन लाखांवर गेली आहे. त्याशिवाय गुजराती भाषेतूनही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
मात्र, केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या भाषांपैकी केवळ बंगाली आणि तमिळ भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का दखलपात्र असून, मराठीसह उर्वरित अभिजात भाषांतून परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
‘अभियांत्रिकी महाविद्यालयातून, आयआयटीतून पदवीप्राप्त अनेकजण आता ‘नीट’ची खासगी शिकवणी घेतात. त्यात प्रामुख्याने परप्रांतीय शिक्षक आहेत. त्यामुळे संवादाची भाषा हिंदी आणि संकल्पना इंग्रजीतून शिकवल्या जातात. मराठीतून शिकण्याची मानसिकता, तयारी अजूनही निर्माण झालेली नाही. आतापासून त्यासाठीची तयारी केल्यास पुढील पाच वर्षांनंतर परिस्थिती बदलू शकेल,’ असे मत तज्ज्ञ मार्गदर्शक हरीश बुटले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. यंदा या परीक्षेसाठी २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पात्र ठरले. देशभरातील विद्यार्थ्यांना एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा देण्याची मुभा असते. त्यानुसार, यंदा सर्वाधिक १८ लाख २२ हजार ४१० विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून परीक्षा दिली. इंग्रजी खालोखाल हिंदी आणि गुजराती भाषेला पसंती मिळत असल्याचे दिसते. यंदा ३ लाख २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी हिंदीतून परीक्षा दिली, तर ५३ हजार २५ विद्यार्थ्यांनी गुजराती भाषेचा पर्याय निवडला.
सर्वाधिक विद्यार्थी इंग्रजीचा पर्याय परीक्षा देण्यासाठी निवडतात, हे आकडेवारीतून स्पष्ट होते. अकरावी-बारावीच्या स्तरावर पाठ्यपुस्तके, अभ्यासासाठी उपयुक्त इतर पुस्तके वैद्यकीय शिक्षणातील संकल्पना प्रामुख्याने इंग्रजी भाषेत असल्याने विद्यार्थ्यांकडून इंग्रजीला पसंती दिली जाते. मात्र, त्या खालोखाल अभिजात दर्जा नसलेल्या हिंदी आणि गुजराती भाषांचा क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या दोन्ही भाषांतील विद्यार्थिसंख्या दर वर्षी वाढत आहे.
तमिळनाडूने ‘नीट’ला सातत्याने विरोध दर्शवला आहे. तसेच, अभिजात भाषेचा दर्जा पहिल्यांदा तमिळ भाषेला देण्यात आला होता. ‘एनटीए’च्या आकडेवारीनुसार, तमिळ भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१९ ते २०२४ या काळात वर्षागणिक वाढत गेली. २०२४मध्ये सर्वाधिक ३६ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी तमिळ भाषेतून परीक्षा दिली. तर यंदा त्यात घट होऊन २६ हजार ५८० विद्यार्थ्यांनी तमिळ भाषेला पसंती दिली.
बंगाली भाषेतून २०१९मध्ये ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यात वाढ होत २०२४मध्ये सर्वाधिक ४८ हजार २६४ विद्यार्थ्यांची नोंद झाली. मात्र, यंदा त्यात घट होऊन ३८ हजार २४२ विद्यार्थ्यांनी बंगाली भाषा निवडली होती.
मराठी भाषेतून २०१९मध्ये आजवरच्या सर्वाधिक ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठीकडे पाठ फिरवली.
यंदा केवळ ९२७ विद्यार्थ्यांनीच मराठी भाषेतून परीक्षा दिली. तसेच, अभिजात दर्जा मिळालेल्या उर्वरित भाषांमध्ये आसामी भाषेतून यंदा २ हजार ४७८, कन्नड भाषेतून केवळ ४६०, मल्याळम भाषेतून ४८१, उडिया भाषेतून ८१२, तेलुगू भाषेतून यंदा ९०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे ‘एनटीए’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मराठीतून अभ्यास साहित्य उपलब्ध नाही. शिवाय, मराठीतून विज्ञानातील संज्ञा, संकल्पना शिकवण्याबाबत स्पष्टता नाही. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. – हरीश बुटले, तज्ज्ञ मार्गदर्शक.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
इयत्ता अकरावी-बारावी विज्ञान शाखेत मराठीतून शिकणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्याशिवाय विज्ञानाची भाषा इंग्रजी असल्याने बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमालाच पसंती देतात. – डी. डी. कुंभार, उपप्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय.