पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशनजवळ धावत्या पीएमपी बसवर झाड पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातात बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.

महापालिकेच्या वतीने पिंपरी ते आकुर्डीदरम्यान अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्तेखोदाई केली आहे. चिंचवड स्टेशन येथील एका खासगी जागेत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या जागेच्या संरक्षक भिंतीच्या आतमध्ये विविध झाडे आहेत. खोदकामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची मुळे तुटली. असे एक आधारहीन झाड सतत पडणाऱ्या पावसामुळे धावत्या पीएमपी बसवर पडले. ही बस चिंचवड स्टेशनकडून निगडीच्या दिशेने जात होती. अपघातात बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. झाड पडले त्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दल, पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली. दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. बसमधील जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करून सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले.

झाड पडल्याची दुसरी घटना

पिंपरीतील एच. ए. कॉलनीसमोर रिक्षावर झाड पडल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. ही घटनादेखील रस्त्याबाजूला खोदकाम केल्यामुळे झाली होती. त्यात रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. चिंचवड स्टेशनजवळ अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे.

खासगी जागेत सीमाभिंतीच्या आतमध्ये हे झाड आहे. महापालिकेने रस्त्यावर खोदाई केल्यामुळे झाड कोसळले नाही.-बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिंचवड स्टेशन ते आकुर्डी दरम्यान रस्त्याच्या बाजूला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे झाड रस्त्यावर पडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तत्काळ वाहतूक सुरळीत केली.- अशोक कडलग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे</strong>