माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित युतीची अखेर सोमवारी अधिकृत घोषणा झाली. या युतीला शिवशक्ती-भीमशक्ती असे संबोधले जात आहे. महाराष्ट्रात या दोन राजकीय ‘शक्ती’ आहेत, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले होते. या शक्ती आजही आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केलेल्या युतीच्या घोषणेची व त्यानुसार राज्याच्या राजकारणात नव्याने आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांची या युतीला पाठिंबा असणाऱ्या व नसणाऱ्या पक्षांनाही दखल घ्यावी वाटणे साहजिक आहे.

 महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर ही दोन्ही नावे मोठी आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे, ही घटना लक्षवेधक ठरते. मात्र यापूर्वीही शिवसेना व आंबेडकरी चळवळीचे विळय़ाभोपळय़ाचे नाते असूनदेखील शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचे लहानसहान प्रयोग झालेच. राज्याच्या राजकारणातील व आंबेडकरी राजकारणातील आणखी एक मोठे नाव म्हणजे रामदास आठवले. दहा वर्षांपूर्वी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करून शिवशक्ती-भीमशक्तीच्या ऐक्याची घोषणा करून, राज्यात एक नवे राजकीय समीकरण त्यांनी तयार केले. पुढे शिवसेना, भाजप, रिपब्लिकन अशी महायुती झाली. परंतु राज्यसभेच्या खासदारकीवरून शिवसेनेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आठवले यांनी भाजपची साथ करणे पसंत केले. आता त्यांची फक्त भाजपशी युती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री आहेत. २०१९ नंतर महायुतीही मोडीत निघाली. उद्धव ठाकरे यांना भाजपला धडा शिकविण्यासाठी अधिकाधिक मित्रांची गरज आहे. त्या गरजेपोटी प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे आगामी निवडणुकांची युद्धे लढण्यासाठी मित्रत्वाचा हात पुढे केला, शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत करीत आंबेडकर यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता या युतीचे काय होणार, महाविकास आघाडीत चौथा पक्ष येणार का, राजकीय परिणाम काय होतील, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आणखी वाचा – शिवसेना-वंचित युतीनंतर महाविकास आघाडीतच कटकटी वाढल्या

खरे म्हणजे अस्वस्थता दोन्हीकडे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले बंड ही शिवसेनेतील आतापर्यंतची सर्वात मोठी फूट आहे. यापूर्वी बंड झाले, परंतु राज यांच्यासह कुणीही शिवसेनेवर दावा सांगितला नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या तीस-चाळीस आमदारांनी थेट शिवसेनेवरच हक्क सांगितला. त्याची न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने सेनेतील बंडाला व फुटीला मोठे बळ दिले आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे साथीदार हे बंडखोर, फुटीर मानले तरी, शिवसेनेची राजकीय लढाई होणार आहे ती थेट भाजपशीच. त्याची सुरुवात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून होईल. या निवडणुकीत वंचित आघाडीचा शिवसेनेला व शिवसेनेचा वंचितला फायदा होईल का, त्याचे थेट उत्तर आता देता येणार नसले तरी, निवडणुकीचे निकाल बदलतील एवढे मात्र नक्की. वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का, हा सध्या प्रश्न आहे, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना-वंचित युतीला आमचा विरोध नाही, असे स्पष्ट करून महाविकास आघाडीच्या विस्ताराला एक प्रकारे अनुकूलता दर्शविली आहे. काँग्रेसही त्यापेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे.

आणखी वाचा – प्रकाश आंबेडकर यांचा ‘नवीन घरोबा’ कितपत यशस्वी होणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरे असे की, सातत्याने प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. महाराष्ट्रातील कायम सत्तेत राहिलेल्या राजकीय घराण्यांमुळे सर्वच समाजातील सामान्य कार्यकर्ता राजकीय सत्तेपासून वंचित राहिला, त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न आपण केल्याची त्यांची भूमिका समजावून न घेता, त्यांना ‘भाजपची बी टीम’ म्हणून बेदखल करण्याचा किंवा त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला व होत आहे. आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना दलितांपुरते मर्यादित ठेवण्याच्या प्रस्थापित पक्षांच्या विशेषत: काँग्रेसच्या सरंजामदारी मानसिकतेला त्यांचा विरोध होता व आहे, त्यातून त्यांनी कायम काँग्रेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा हस्ते परहस्ते भाजपला फायदा झाला, हेही वास्तव आहे. आज देशातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, धर्माधिष्ठित राजकारणाची धार अधिक टोकदार व तीक्ष्ण केली जात आहे, त्यामुळे आंबेडकरी अनुयायी अस्वस्थ आहेत. १९९० मध्ये राज्यात भाजप-शिवसनेचे वर्चस्व वाढू लागले होते, त्या वेळी आंबेडकरी समाजात अशीच अस्वस्थता वाढली होती, त्यामुळेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची काँग्रेसशी युती स्वीकारली गेली. १९९२च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला व रिपब्लिकन पक्षालाही झाला होता. महापालिकेत काँग्रेस-रिपब्लिकन युतीची सत्ता आली होती. आजही तशीच- त्याहून अधिक अस्वस्थता आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या मागे ही अस्वस्थता एकवटली तर ती खरी भीमशक्ती असेल व राजकारण बदलण्याची सुरुवात मुंबईपासून होईल.