एमआयडीसीकडून २०९ उमेदवारांना लवकरच नेमणूकपत्र

बदलापूर : मागील दहा वर्षांपासून सुरू असलेले बारवी धरण विस्तारीकरणातील पुनर्वसनाचे काम अखेरच्या टप्प्यात असताना या कामात रोजगार गमावलेल्या २०९ उमेदवारांना लवकरच नोकरी मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३५ टक्केपाणी वाटय़ानुसार देय असलेल्या ३३२ नोकऱ्यांपैकी २०९ पात्र उमेदवारांना नेमणूकपत्र दिले जाणार आले.

बारवी धरणात झालेल्या अतिरिक्त पाणी साठय़ाचा फायदा ज्या महापालिकांना होणार आहे त्या महापालिकांनी पात्र धरणग्रस्तांना पाण्याच्या वाटय़ानुसार प्रति घरटी एक नोकरी देण्याचे ठरले होते. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि बदलापूर या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ३५ टक्के नोकऱ्या देणे ठरले होते. त्यानुसार एमआयडीसीने ३३२ पात्र धरणग्रस्तांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. गेल्या वर्षांत एमआयडीसीने या पात्र धरणग्रस्तांना नोकरी देण्याच्या अनुषंगाने प्रRि या सुरू केली होती. त्यानुसार मीरा भाईंदर येथे नोव्हेंबर महिन्याची परीक्षा पार पडली. त्यातील २०९ जण नोकरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयडीसीतर्फे देण्यात आली आहे.

नोकरी किंवा १० लाख रुपये

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात पात्र उमेदवारांना नोकरी किंवा १० लाख रुपयांचा पर्याय देण्यात आला आहे. यातील १२०० कुटुंबांना नोकरी देणे अपेक्षित आहे. आतापर्यंत अवघ्या ६५० कुटुंबांतून नोकरीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. काही कुटुंबांतील मुले लहान आहेत तर अनेक तरुणांचे शिक्षण सुरू आहे. त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीत सामावून घेतले जाऊ  शकते. त्यासाठी अर्ज करण्याची कोणतीही कालमर्यादा नसल्याचेही एमआयडीसी प्रशासनाने सांगितले आहे.