कल्याण – टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील (पाॅक्सो) एक सराईत आरोपी होता. या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात कोठडीची मुदत संपल्याने हजर केले होते. या आरोपीला पुन्हा पोलीस वाहनातून आधारवाडी तुरूंगात नेले जात असताना, पोलीस त्याला बेड्या लावत होते. यावेळी आरोपीने दोन्ही पोलिसांच्या हाताला जोराचा झटका देऊन पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानक भागातील गर्दीचा फायदा घेऊन आरोपी पळून गेला.
चैतन्य राजू शिंदे (२१) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहिदासनगरचा रहिवासी आहे. तो रोहा रेल्वे स्थानक परिसरात राहतो. चैतन्य शिंदे याच्यावर टिटवाळा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गेल्या वर्षी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यची चौकशी करून टिटवाळा पोलिसांनी चैतन्यला अटक केली आहे. तो टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात आहे.
आरोपी चैतन्य शिंदे याची कोठडीची मुदत संपल्याने टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हवालदार रामदास राठोड यांनी चैतन्याला शुक्रवारी संध्याकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने चैतन्य शिंदेला २० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे चैतन्यची रवानगी आधारवाडी येथील तुरूंगात करण्यात येणार होती. कल्याण मधील आधारवाडी तुरूंगात नेण्यासाठी उपनिरीक्षक जाधव, हवालदार राठोड यांनी त्याला दंडाला पकडून न्यायालयातून बाहेर आणले.
कल्याण न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचे वाहन उभे होते. तेथे चैतन्यला घेऊन जात असताना आणि पोलीस वाहनात बसण्यापूर्वी उपनिरीक्षक जाधव, राठोड आरोपी चैतन्यला बेड्या लावत होते. यावेळी पळण्याच्या तयारीचा विचार करत असलेल्या चैतन्यने जवळच उभ्या असलेल्या जाधव, राठोड यांच्या हाताला जोराने हिसका मारला आणि तो कल्याण रेल्वे स्थानक दिशेने पळत सुटला. दोन्ही पोलिसांनी चैतन्यचा तात्काळ पाठलाग केला. परंतु, रेल्वे स्थानक आणि परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन चैतन्य पसार झाला. तो कल्याण रेल्वे स्थानकातून लोकलने सीएसएमटी दिशेने पळून गेला असण्याचा संशय पोलिसांना आहे.
हवालदार रामदास राठोड यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक जानू पवार याप्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित आरोपी कोणालाही रेल्वे स्थानक भागात आढळून आल्यास त्यांनी तात्काळ टिटवाळा किंवा महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.