डोंबिवली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या आणि संबंधित दृश्यचित्रफित प्रसारित करणाऱ्या इसमा विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या ठाणे जिल्हा शाखेने येथील रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
हेही वाचा : डोंबिवलीत तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून ३३ लाखांची फसवणूक
अडीच मिनिट एक इसम एका दृश्य ध्वनी चित्रफितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी नावाने उल्लेख करून त्यांच्या जातीचा उल्लेख करत आहे. तसेच, राज्यातील ब्राह्मण समाज तीन मिनिटांत संपून टाकण्याची भाषा करत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे प्रयत्न काही मंडळी करत आहेत. समाजातील सलोखा, सर्वधर्मसमभाव संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय ब्राह्मण समाजाला लक्ष्य करून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यासाठी तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तिला आणि ही ध्वनीचित्रफित प्रसारित करणाऱ्या योगेश सावंत इसमाला पोलिसांनी तात्काळ अटक करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे शशांक खेर आणि सहकाऱ्यांनी केली आहे.