केवळ २५ व्यक्तींची नोंदणी मर्यादा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल

पुढील वर्षी मार्च अखेरीस बँक तसेच अन्य संलग्न सेवांना आधार क्रमांक जोडणे अनिवार्य असल्याने आधार कार्ड नोंदणी कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यात अनेकांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी, ईमेल आयडी बदल करण्यासाठीच्या कामांचाही समावेश आहे. बँकांमध्ये एकावेळी २५ व्यक्तींना आधार सेवा दिली जाते. त्यामुळे उर्वरित व्यक्तींना घरी परतावे लागते. आपला प्रथम क्रमांक लागावा म्हणून पहाटे दोन ते तीन वाजल्यापासून रहिवासी बँका, आधार केंद्रासमोर रांगा लावून बसत आहेत.

आधारकार्ड नोंदणी व इतर कामांसाठी आपला क्रमांक लवकर लागावा यासाठी पहाटे उठून नागरिक आधार केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील हॉटेल सम्राट चौकात एका आधार केंद्राच्या बाहेर पहाटे तीन वाजल्यापासून कडकडीत थंडीत काही ज्येष्ठ नागरिक अंगावर चादर, स्वेटर लपेटून येऊन बसून राहतात. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

अशाच रांगा शहरातील बँकांसमोर लागलेल्या आहेत. बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना आपले नियमित काम करून ही सुविधा द्यावी लागते. त्यामुळे बँकेत दररोज फक्त २५ रहिवाशांना आधार संलग्नित काम करून दिले जाते.

उर्वरित रहिवाशांना दुसऱ्या दिवशी येण्याची सूचना केली जाते. बँक सुरू झाल्यानंतर रांगेतील पहिल्या २५ जणांना बँक कर्मचारी आधार कार्डमधील फेरबदला संदर्भात अर्ज देतो. उर्वरित रहिवासी मग हिरमुसलेल्या चेहऱ्याने, कर्मचाऱ्यांशी वाद घालून परत निघून जातात.

अशीच परिस्थिती कल्याणमध्येही दिसून येत आहे. अनेक रहिवासी सुट्टी घेऊन आधारमधील पत्ते, नाव व अन्य बदलासाठी रांगेत उभे राहत आहेत. त्यांचा क्रमांक लागला नाही तर त्यांची सुट्टी वाया जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील देना बँकेसमोर आपण आधारमधील काही बदलासाठी रांगेत होते. पण या रांगेत पहाटे चार वाजता उभ्या राहिलेल्या एका व्यक्तीला २५ वा क्रमांकाचा अर्ज मिळाला. म्हणजे रहिवासी त्या अगोदरपासून रांगेत आल्याचे दिसून आले. मागील दोन दिवस आपण बँकेत आधार कामासाठी जात आहे. २५ च्या पुढे आपला क्रमांक असल्याने दोन दिवस फुकट गेले आहेत.

सायली भिंगार्डे, रहिवासी