Thane Municipal Corporation / ठाणे : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून ठाणे-सीएसएमटी रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून ४० ज्यादा बसगाड्या ठाणे सॅटीस पुलाहून मुलुंडपर्यंत सोडण्यात येत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे मार्गावर बसला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे ते सीएसएमटी या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला तसेच मुंबईच्या इतर महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु, अनेक खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु आहेत. कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदाराला त्याचा परिणाम सहन करावा लागला. ठाणे- सीएसएमटी रेल्वे सेवा तात्पुरती बंद झाल्याने अनेक नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकात अडकून होते. दरम्यान, या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून ज्यादा बस गाड्यांचे नियोज आखण्यात आले आहे. ठाणे सॅटीस ते मुलुंड या मार्गावर टीएमटीच्या ४० गाड्या सोडल्या आहेत. या मार्गावर सकाळी १० वाजल्यापासून बस गाड्यांच्या फेऱ्या सुरु आहेत. मुलुंडहून या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्टच्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे टीएमटी गाड्या मुंलुंडपर्यंत सोडण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाचे वाहतूक व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.