ठाणे : कल्याण शिळ रोड परिसरात वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिला दलालास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तसेच तिच्या ताब्यात असलेल्या तीन पीडित व असहाय्य महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण शिळ परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या आवारात एक महिला दलाल काही पिडीत आणि असहाय्य महिलांना फसवून वेश्या व्यवसायासाठी घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या हॉटेलच्या आवारात सापळा रचत त्या महिलेला अटक केली.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.