सकाळपासूनच बाजारांत गर्दी होत असल्याने आदेशांवर प्रश्नचिन्ह

ठाणे : करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे ठाणे जिल्ह्यत सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आल्याने व्यापारी वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारांत होणारी गर्दी आणि अंतरनियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, नव्या र्निबधांमुळे सकाळपासूनच बाजारात गर्दी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या आदेशांवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत.

राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या शहरात दुकाने पूर्णवेळ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे व्यापारीवर्ग आनंदला होता. गेल्या चार महिन्यांपासून दुकानांमध्ये पडून असलेल्या वस्तू अनेक व्यापाऱ्यांनी स्वस्तात विक्रीसाठी काढल्या होत्या. पावसाळय़ाच्या तोंडावर विविध साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दीही होऊ लागली आहे. मात्र,  राज्य सरकारने करोनास्थितीच्या पहिल्या दोन स्तरांवरील ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना तिसऱ्या स्तरात समाविष्ट केले. त्यानुसार, येथील दुकाने, उपाहारगृहे आता सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहणार असून याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली.

या र्निबधांबाबत व्यापारी वर्गात मात्र नाराजी आहे. नागरिक सायंकाळी उशिराने  खरेदीसाठी बाहेर पडत असतात. याचवेळेत आमची दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे. ग्राहकांच्या मागणीचा अंदाज घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारातून मोठय़ा प्रमाणात माल आणून ठेवला. मात्र, अचानक निर्बंध लागू झाल्यामुळे या मालाची विक्री मंदावणार आहे. आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असताना पुन्हा लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आता व्यापारी संकटात सापडल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

पहिल्या दिवशी सूट?

सोमवारपासून नव्या र्निबधांच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला असला तरी जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांमधील दुकाने सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधील व्यापारी तसेच दुकान चालकांमध्ये या नव्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पहिला दिवस असल्याने दुकानदारांना सूट दिल्याचे चित्र होते. पहिल्या दिवशी उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर अपवादानेच कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी मात्र खरेदी तसेच इतर व्यवहारांसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

उपाहारगृहेही हतबल

उपाहारगृहांमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत ग्राहकांना प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे उपाहारगृहांचे चालकही नाराज आहेत. बहुतांश ग्राहक रात्रीच्या जेवणासाठी उपाहारगृहांत येत असतात. अशा वेळी उपाहारगृहे बंद असल्यास व्यावसायिक नुकसान होईल, असे एका उपाहारगृहाच्या मालकाने  सांगितले.

राज्य सरकारच्या या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. ठाण्यात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यास ज्या ठिकाणी करोना रुग्णसंख्या अधिक आहे, त्या क्षेत्रातच सरकारने निर्बंध घालावेत. व्यवसायावर निर्बंध आल्यास व्यापाऱ्यांचे आणि सरकारचेही यात नुकसान आहे.

– आशीष शिरसाट,