लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांनाच कॅडबरी चॉकलेट आवडते. पण कॅडबरीच्या क्षेत्रात नावाजलेला ब्रँड असलेल्या डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये चक्क अळी सापडल्याचा दावा एका ग्राहकानं केला आहे. याचा व्हिडीओही या व्यक्तीने एक्सवर (ट्विटर) पोस्ट केला आहे. या व्यक्तीनं केलेली ही पोस्ट थोड्याच कालावधीत व्हायरल झाली असून कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.

काय आहे या पोस्टमध्ये?

रॉबिन झॅकियस नावाच्या एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. हा सगळा प्रकार हैदराबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे का? सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतल्या या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्न या रॉबिन यांनी पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

दरम्यान, रॉबिन यांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केला असून त्यात डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्धवट फाडलेल्या रॅपरमध्ये कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. या व्हिडीओसोबत खरेदीचं बिलही देण्यात आलं असून त्यात ९ फेब्रुवारी रोजी ही कॅडबरी रत्नदीप रिटेल शॉपमधून ४५ रुपयांना खरेदी केल्याचं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅडबरी डेअरी मिल्कचं उत्तर

दरम्यान, रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कनं त्यांचं उत्तरही दिलं आहे. “नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची कॅडबरी इंडिया लिमिटेड) नेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार suggestions@mdlzindia.com वर पाठवा. त्यासोबत तुमचं पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची माहिती द्या”, अशी विनंती कंपनीकडून संबंधित ग्राहकाला करण्यात आली आहे.