जन्माला आलेल्या माणसाचा मृत्यू निश्चित असतो. हे विधिलिखित असते. मात्र मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणे शक्य नाही. असे असतानाही एखादी व्यक्ती मृत्यूच्या काही तासांनंतर पुन्हा जिवंत झाली, असे एकदा तरी तुमच्या कानावर आले असेल. अशीच एक घटना मेक्सिको येथे घडली आहे. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराच्या तयारीच्या वेळी शवपेटीत अडकलेली तीन वर्षांची मुलगी पुन्हा जिवंत झाली.
तीन वर्षीय कॅमिलाची आई मेरी जेन मेंडोझा यांनी सांगितले की, कॅमिलाला उलट्या होत होत्या. तसेच, तिला पोटदुखी आणि ताप होता. तेव्हा ती आपल्या मुलीला विला डी रोमास येथील बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेली. मुलीची प्रकृती पाहून बालरोग तज्ज्ञांनी तिला सामुदायिक रुग्णालयात नेण्यास सांगितले. सामुदायिक रुग्णालयात मुलीवर डिहायड्रेशन आणि ताप यावर उपचार करण्यात आले. यानंतर मुलीला घरी नेण्यास सांगितले.
घरी आणल्यानंतर मुलीची प्रकृती पुन्हा बिघडली. पालकांनी तिला पुन्हा दवाखान्यात नेले असता उपचारानंतर काही तासांनी डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीच्या आईने सांगितले की त्यांनी तिला आयव्ही ड्रिपसाठी आणले होते. पण ऑक्सिजन मिळायला वेळ लागला. उपचार सुरू झाल्यावर काही तासांनी डॉक्टरांनी माझ्या बाळाला मृत घोषित केले.
१७ ऑगस्ट रोजी कॅमिला रोक्सानाला मृत घोषित करण्यात आले. १२ तासांनंतर, जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती, तेव्हा मुलीच्या आईला शवपेटीतील काचेवर बाष्प साठलेले दिसले. त्यांनी ही माहिती तिथे उपस्थित लोकांना दिली. पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणाले की ती शॉकमध्ये आहे, म्हणून तिला भास होत आहेत. त्यांनी तिला शवपेटी उघडण्यापासूनही थांबवले.
यानंतर, कॅमिलाच्या आजीने, तिचे डोळे हलत असल्याचे पाहिले. अखेर मुलगी आतून रडायला लागली आणि आवाज देऊ लागली. त्यानंतर शवपेटी उघडण्यात आली. कॅमिला जिवंत आहे हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर कुटुंबीयांनी तिला घेऊन तातडीने रुग्णालयात धाव घेतली. पण दुर्दैवाने कॅमिलाने दुसऱ्यांदा हे जग सोडले. डॉक्टरांनी तिला पुन्हा मृत घोषित केले.
मुलीच्या आईचे म्हणणे आहे की जर कॅमिलाला वेळेवर उपचार मिळाले असते तर ती आज जिवंत असती. जनरल स्टेट अॅटर्नी, जोस लुईस रुईझ यांच्या मते, या प्रकरणाची चौकशी केली जात असून मुलीच्या मृतदेहाची तपासणी करण्यात येत आहे.