Groom Died in Wedding: लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि ते पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण, काहींच्या नशिबात याचंही सुख नसतं. सध्या असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी घडलाय, ज्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय. यात लग्नाच्याच दिवशी नवरदेवाची हत्या होते.

उत्तर प्रदेशातील गाजीपूर भागातून एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. लग्न झाल्याच्या काही मिनिटांतच एका वराला बेदम मारहाण करण्यात आली. काही लोकांनी नवऱ्यावर हल्ला केला आणि डीजे आणि नाचगाण्याने सुरू असलेला आनंदाचा कार्यक्रम अचानक हिंसक वळणावर गेला .

FPJ च्या वृत्तानुसार डीजेवर नाचत असताना काही तरुणांचे अचानक इतर पाहुण्यांशी भांडण झाले. वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाद वाढत गेला आणि वराच्या वडिलांनी तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण, ते लोक थांबले नाहीत; उलट त्यांनी वृद्ध व्यक्तीवर काठ्यांनी हल्ला केला. नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी नवरदेव स्टेजवरून खाली उतरला, तर तरुणांनी त्यालाही मारहाण केली.

हल्ला करणारे मद्यधूंद

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, वधूच्या खोलीबाहेर तिच्या दारावर वराला मारहाण करण्यात आली. दारू प्यायलेल्या अवस्थेत आरोपींनी नवरदेव असलेल्या राकेशला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणादरम्यान एका तरुणाने बंदुकीने वराच्या डोक्यावर वार केला. दरम्यान, गुरुवारी लग्नसमारंभ सुरू असताना ही घटना घडली.

वराचा मृत्यू

राकेश कुमार असे वराचे नाव असून, डीजे डान्स एरियामध्ये झालेल्या भांडणातून वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी वाराणसीच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसात गुन्हा दाखल

त्याच्या वडिलांनी पोलिसांना संपर्क साधला आणि लग्नात गोंधळ घालणाऱ्या माणसांची माहिती दिली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्यापैकी एकाला अटक केली आहे, ज्याच्याकडे बेकायदा पिस्तूल आहे. पोलिस इतर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.