Viral Video: आई म्हटलं की प्रेम, वात्सल्य, माया हे शब्द नकळत आपल्या ओठांवर येतात. प्रत्येक व्यक्तीला त्याची आई खूप प्रिय असते आणि म्हणूनच आई आणि मुलांचे हे ऋणानुबंध अजरामर असतात. येत्या काही दिवसांत ‘मदर्स डे’देखील साजरा केला जाणार आहे. याचदरम्यान एक आई आणि तिच्या मुलांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही नकळत भावूक व्हाल.

आई आणि मुलांचं प्रेम फक्त माणसांमध्येच नाही, तर अनेकदा प्राण्यांमध्येही दिसून येते. समाजमाध्यमावर अनेकदा प्राणी आणि त्यांच्या पिल्लांचे व्हिडीओ समोर येतात. त्यात कधी हत्ती आणि त्याचे पिल्लू असते; तर कधी मांजर आणि तिची पिल्लं असतात. या पार्श्वभूमीवर एका वाघिणीचा आणि तिच्या पिल्लांचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो सध्या खूप चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वाघीण एका ठिकाणी निवांत बसलेली आहे. त्यावेळी एकामागे एक असे चार शावक तिच्याजवळ येऊन तिला कुरवाळतात आणि नंतर सगळे मिळून आईला मिठीदेखील मारतात. हा सुंदर व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भारावून गेले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ @Madhya Pradesh Tourism या X (पूर्वीचे ट्विटर) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये, “आईला मिठी मारण्याचे सुख जगात कुठेच नाही! वरुण ठक्कर यांनी #PannaTigerReserve मध्ये आईकडे प्रेमासाठी धडपडत असलेल्या या सुंदर पिल्लांना पाहिले. हृदयस्पर्शी वन्यजीव भेटीसाठी तुम्हीही इच्छुक असाल तर या ‘मदर्स डे’ला आपल्या आईसोबत मध्य प्रदेशमधील पन्ना टायगर रिजर्व्हला नक्की भेट द्या.” असं लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: जुगाड असावा तर असा! शर्टच्या इस्त्रीसाठी चक्क तापलेल्या कुकरचा वापर; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हे टॅलेंट…”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला आतापर्यंत नऊ हजारहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, अनेक लाइक्स व कमेंट्सही युजर्सनी केल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलंय, “आई आणि मुलांचं प्रेम खूप नि:स्वार्थी असतं.” तर दुसऱ्यानं लिहिलंय, “आज पाहिलेला सुंदर व्हिडीओ.”