Adani Udyog Samuha,Sanjay Gandhi National Park / वसई : मुंबईतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि सत्ताधारी पक्षांवर हल्ला चढवत असताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या काही प्रकल्पांचा दाखला दिला. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या भाषणात राज ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाचा उल्लेख करत असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या जंगलात होणारी वृक्षतोडीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला.
अदानी समूहाच्या विद्युत प्रकल्पासाठी जंगलाची शेकडो एकर जमीन दिली जात असल्याचे ते म्हणाले. ही जमीन नेमकी कुठे आहे आणि यामुळे नेमक्या कोणत्या जंगलावर घाला घातला जाईल असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले असून पालघर जिल्ह्यातील प्राणवायूचा झरा असणारे हे जंगल कोणत याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.
रविवारी मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी असलेल्या नेस्को मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जागा आहे ती जागा अदानी समूहाला वीज प्रकल्प उभारणीसाठी दिली जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांवर घाला घातला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर अभयारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य परिसर आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्य, विविध प्रकारचे पशु पक्षी, विविध प्रजातीचे वृक्ष याने बहरलेला परिसर होता. मात्र मागील काही वर्षांपासून या जंगलात झाडांची कत्तल, शिकारी, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे यामुळे हे अभयारण्य धोक्यात आले आहे.
या संरक्षित वनाचे संवर्धन व्हावे व येथील वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवताल क्षेत्र इको सेन्सेटीव्ह झोन घोषित करण्यात आला आहे. असे असतानाच आता या अभयारण्यातील जागा ही अदानी समूहाला वीज प्रकल्प उभारणी साठी दिली जात आहे. याबाबत राज ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या मुद्दाला हात घातला. त्यामुळे या अभयारण्यातील नेमकी किती जागा या प्रकल्पासाठी दिली जात आहे याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
वीज प्रकल्पासाठी अभयारण्यातील किती जागा ?
तुंगारेश्वर अभयारण्यात येत असलेली जागा संरक्षित वन जमीन केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने अदाणी इलेक्ट्रिसिटीकडे हस्तांतरित करण्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता दिली आहे. या जागेत एक हजार मेगावॉट ३२० केव्ही एच.व्ही.डी.सी. व्ही.एस.सी. आधारित लिंक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर क्षेत्रातील मुंबई वीज वितरण सक्षम होईल असे सांगितले जात आहे.
अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांनी ही या संरक्षित वन जमिनीवर काम करण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. यात मांडवी, शिरसाड, पेल्हार, चिंचोटी, कोल्ही, चंद्रपाडा, ससूनवघर व ठाणे येथील कसबे घोडबंदर अशा भागातील सुमारे १. १९०४ हेक्टर इतकी जमीन हस्तांतरण करण्यात आल्याची घोषणा कंपनीने सार्वजनिक नोटीस द्वारे केली होती.
