उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेमध्ये पाच वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. अजितदादांनी २००९ मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्रामध्ये पती-पत्नीची मिळून १० कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता दाखविली होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी दाखल केलेल्या वितरणपत्रानुसार ही मालमत्ता ३७ कोटींहून  अधिक झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांत त्यांची मालमत्ता तिपटीहून अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाबरोबर त्यांची मालमत्तेचे विवरण पत्र दिले असून, त्यानुसार अजित पवार व त्यांच्या पत्नीची मिळून एकूण मालमत्ता सुमारे ३७ कोटी ९३ लाख रुपयांची आहे. अजित पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे २१ कोटी रुपये, तर सुनेत्रा पवार यांची एकूण मालमत्ता १६ कोटींपेक्षाही अधिक आहे.