News Flash

फुटीनंतर..शिवसेना एकाकी?

शिवसेनेचे ‘मिशन १५१’ हे दीर्घकाळ टिकलेल्या युतीच्या तुटीला कारणीभूत ठरले. सत्तेची चाहूल स्पष्ट असतानादेखील, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे हे मिशन मागे घेण्याची शिवसेना पक्षप्रमुख

| September 27, 2014 03:52 am

फुटीनंतर..
युती तुटली, आघाडी फुटली.. आता पुढे काय? या फाटाफुटीचा कोणाला लाभ होणार, कोणाची हानी होणार? बदलत्या परिस्थितीत विविध पक्षांसमोर कोणती आव्हाने आहेत? बदलत्या परिस्थितीत कोण कोणते डाव आखील आणि पेच टाकील? अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध..
ढेपाळलेली काँग्रेस!
संकुचित लाभाचेच स्वप्न!
‘घटस्फोटा’ने मनसेत चैतन्य!
‘हाता’ विना ‘घडय़ाळा’ची टिकटिक
शिवसेना एकाकी?
शिवसेनेचे ‘मिशन १५१’ हे दीर्घकाळ टिकलेल्या युतीच्या तुटीला कारणीभूत ठरले. सत्तेची चाहूल स्पष्ट असतानादेखील, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे हे मिशन मागे घेण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तयारी नव्हती. मुळात, महायुती असताना १६९ जागांपैकी १५१ जागांचे स्वप्न पाहणे तसे धाडसीच होते. आतापर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता लढवीत असलेल्या जागांच्या तुलनेत भाजपच्या यशाचे प्रमाण शिवसेनेपेक्षा अधिक राहिले आहे. तरीही लोकसभेतील यशावर भरवसा ठेवून सेनेने हे मिशन ठरविले. भाजपसारखा जुना साथीदार त्यामुळे गमवावा लागेल, याची जाणीव होऊनही शिवसेना त्यावर ठाम राहिली. अधिक जागा मिळविण्यासाठी प्रत्येक निवडणुकीप्रमाणे ही खेळी असल्याचा तर्क होता. पण युती तुटल्याने आणि घटकपक्षांचीही साथ सुटल्याने शिवसेनेला एकटय़ानेच लढावे लागणार आहे.
एक लाट तोडी त्यांना..
घटकपक्षांना आपल्याकडे राखण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही शिवसेनेला त्यात यश मिळाले नाही. आता तुटीनंतर तर, आदित्य ठाकरेंचे मिशन गाठणे शिवसेनेलाही अशक्यप्राय ठरणार आहे. स्वबळावर लढताना शंभरी तरी ओलांडली जाईल का, याविषयी साशंकता आहे. शिवसेना-मनसे युती होण्याविषयी उलटसुलट चर्चा होत असल्या तरी ठाकरे बंधूंमधील वादाची कारणे लक्षात घेता, सारे काही विसरून लगेच युती होईल, अशी शक्यताही धूसरच आहे.  युती तोडण्याचे मुख्य खापर अमित शहांवरच फोडले जाण्याची चिन्हे आहेत. त्यानिमित्ताने मराठी अस्मिता व स्वाभिमान आणि गुजराती वाद पेटविला जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरून त्या दृष्टीने शिवसेना कार्यकर्त्यांकडून वातावरण पेटविले जात आहे. शिवसेनेवर टीका करायची नाही, असे भाजपने जाहीर केले असले तरी शिवसेनेकडून ते पथ्य पाळले जाईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेते व राज्यातील नेत्यांची फौज आहे, तेवढी सशक्त फौज शिवसेनेकडे नाही. शिवसेनेच्या प्रचाराची मुख्य धुरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असून राज्यभर फिरू शकतील, एवढे नेते शिवसेनेत मोजकेच आहेत. त्यामुळे कमी वेळात राज्य पिंजून काढणे हे उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हान आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वातावरण असले तरी ती मते भाजपऐवजी सेनेकडे खेचण्यासाठी शिवसेनेला भाजपविरोधात प्रचार मोहीम राबविणे अपरिहार्य ठरणार आहे. मोदी लाट नसल्याचे ठाकरे यांनी कितीही सांगितले, तरी त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आकर्षण व आत्मीयता आहे. शिवसेनेचा पारंपरिक मतदार असताना भाजपचे हे मतदार शिवसेनेकडे वळविण्यासाठी राजकीय व्यूहरचना व प्रचाराचे सूत्र शिवसेनेला ठरवावे लागणार आहे.  भाजपची मदार सर्वेक्षणांवर असली तरी ठाकरे हे शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते, त्यातून गृहीतके बनवितात व राजकीय व्यूहरचना करतात. शिवसेनाही सध्या अतिशय आक्रमक भूमिकेत असून गेले दीड-दोन महिने ठाकरे यांनी पद्धतशीरपणे निवडणुकीसाठी तयारी केली आहे.  जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करून आणि अनेक ठिकाणी सभा-मेळावे घेऊन अन्य पक्षांवर आघाडी घेतली. आता तुटीनंतर पुढील तीन आठवडय़ांत प्रचाराचा धडाका शिवसेना कसा लावते, त्यावर यशापयश अवलंबून राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:52 am

Web Title: shiv sena isolated after saffron alliance break up
Next Stories
1 आता भाजपचे ‘मिशन १४५’!
2 ‘हाता’ विना ‘घडय़ाळा’ची टिकटिक
3 ढेपाळलेली काँग्रेस!
Just Now!
X