संजीव कुळकर्णी

‘भारत जोडो अभियाना’च्या यात्रेतून मिळालेल्या संस्काराचे फलित म्हणजे किनवटचे साने गुरुजी रुग्णालय, असे डॉ. अशोक बेलखोडे म्हणतात. कितीही अडचणी आल्या तरी किनवट सोडणार नाही, असे वचन त्यांनी बाबा आमटे यांना दिले होते. हळूहळू ते आणि त्यांचे रुग्णालय स्थिरावले. आता हे रुग्णालय किनवट परिसरातील रुग्णांसाठी आशास्थान ठरले आहे.

नांदेडहून किनवट शहराकडे जाताना या शहराच्या तीन किलोमीटर अलीकडे हमरस्त्याच्या उजव्या बाजूला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा मोठा फलक दृष्टीस पडतो. सुमारे ५४ हेक्टर क्षेत्रात हे औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात आले आहे; पण तीन दशके लोटली तरी ही वसाहत आजही उजाड आहे. ना उद्योग, ना प्रकल्प असे भकास चित्र. याच वसाहतीत आणखी एक फलक दिसतो. ‘नियोजित साने गुरुजी रुग्णालयाची जागा’ असा मजकूर या फलकावर आहे. पाच एकर जागेवर एक आधुनिक, तातडीच्या सेवा उपलब्ध असलेले सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यावरून लक्षात येते.

किनवटसारख्या आदिवासी-बंजाराबहुल तालुक्याच्या ठिकाणी साने गुरुजींचे नाव धारण केलेले सध्याचे रुग्णालय अत्यंत समर्पित, सेवाभावी वृत्तीने चालविले जात आहे, हे मात्र ही औद्योगिक वसाहत पार करून शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतरच समजते. डॉ. अशोक बेलखोडे हे नाव नांदेड जिल्ह्य़ातच नव्हे, तर मराठवाडय़ातील वैद्यक क्षेत्राला, रचनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना परिचित आहे. समाजसेवक बाबा आमटे, यदुनाथ थत्ते यांच्याकडून समाजसेवेची दीक्षा घेत २५ वर्षांपूर्वी किनवटला आलेल्या बेलखोडे यांनी या शहराला, तालुक्याला आपली कर्मभूमी मानून, याच नव्हे तर आसपासच्या मोठय़ा भागाचीही आरोग्यविषयक गरज पूर्ण करताना या पहिल्या गैरसरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून तीन लाख लोकसंख्येच्या परिसराला मोठा दिलासा दिला.

विदर्भातील कोतेवाडा (ता. हिंगणा) ही जन्मभूमी, वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबाद शहर ही संस्कारभूमी आणि आता किनवट हीच कर्मभूमी झालेल्या डॉ. बेलखोडे यांच्या आरोग्यसेवा, आरोग्यविषयक प्रबोधन-जागृती व इतर पूरक कामांना २५ वर्षे उलटून गेली आहेत. ‘भारत जोडो युवा अकादमी, लातूर’ ही सार्वजनिक संस्था मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियमाखाली स्थापन करून त्यामार्फत किनवटसारख्या एका टोकाच्या शहरात, अतिमागास तालुक्यात साने गुरुजी रुग्णालय सुरू करून यशस्वीपणे चालविणे, हे एक धाडसी पाऊल होते. सोबत बाहेरचा एकही डॉक्टर सहकारी नव्हता आणि प्रशिक्षित कर्मचारीही नव्हते; पण बेलखोडे यांनी हा नवा प्रयोग एक ‘मिशन’ म्हणून, एक आव्हान म्हणून स्वीकारला. हळूहळू त्याला स्थर्य प्राप्त होत गेले. आता त्यांचे व त्यांच्या संस्थेचे लक्ष्य आहे ते सध्या छोटय़ाशा जागेत असलेल्या साने गुरुजी रुग्णालयाचे नव्या जागेत सुसज्ज, आधुनिक हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचे!

मराठवाडय़ात विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून रुग्णालय उभारण्याचा प्रयोग सर्वप्रथम डॉ. अशोक कुकडे यांनी लातूरला स्वामी विवेकानंद यांचे नाव देऊन केला. त्यानंतर डॉ. शशिकांत अहंकारी यांनी अणदूर गावी एका वेगळ्या, ध्येयवादी मार्गाने वैद्यकीय सेवा सुरू केली. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात औरंगाबादेत काही तरुण डॉक्टरांच्या चमूने एकत्र येत डॉ. हेडगेवार रुग्णालय सुरू केले. याच काळात डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी गडचिरोलीतील दुर्गम भागात आरोग्य सेवेसोबत संशोधनाचे अत्यंत लक्षणीय कार्य सुरू केले होते. त्यांच्या व्यापक कामाचा परिचय महाराष्ट्राला १९९४ मध्ये डॉ. अनिल अवचट यांच्या ‘शोध आरोग्याचा’ या प्रदीर्घ लेखातून झाला. त्याच सुमारास डॉ. बेलखोडे यांनी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने साने गुरुजींचे नाव देऊन किनवटसारख्या गावात ‘ट्रस्ट हॉस्पिटल’ची मुहूर्तमेढ रोवली.

डॉ. बेलखोडे किनवटला येण्यापूर्वी मुंबईहून उच्चशिक्षित झालेले डॉक्टर अरुण गद्रे हे आपल्या डॉक्टर पत्नीसह या अनोळखी शहरात आले. डॉ. प्रकाश आमटे हे त्यांचे प्रेरणास्थान होते. बँकेचे कर्ज काढून त्यांनी दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व समाजसेवेचा हळूहळू विस्तार करण्याचे त्यांचे ध्येय होते; पण दोन वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी आपला किनवटचा वैद्यकीय संसार थांबविण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांचे ‘किनवटचे दिवस’ हे पुस्तक वाचकांसमोर आले. ते वाचल्यानंतर कोणताही हुशार, निष्णात डॉक्टर मोठय़ा शहरातून किनवटसारख्या गावात येण्याची व विश्वस्त संस्थेमार्फत रुग्णालय स्थापून चांगल्या दर्जाची आरोग्य तपासणी व उपचारांची सेवा देण्याची सुतराम शक्यता नव्हती; पण हेच पुस्तक वाचून डॉ. बेलखोडे यांनी किनवटमध्ये जाण्यासाठी प्रथम शासकीय नोकरीचा पर्याय निवडला. ते साल होते १९९३. त्यांनी वरिष्ठांकडे किनवटला नियुक्ती मागताच तेही चकित झाले होते. दोन वर्षांच्या शासकीय नोकरीतून आरोग्यविषयक सुविधांची स्थिती, समाजव्यवस्था, लोकांची निकड याचा बऱ्यापैकी अंदाज आल्यावर तेव्हा वयाच्या पस्तीशीत असलेल्या बेलखोडे यांनी साने गुरुजी रुग्णालय सुरू केले.

किनवट हा जिल्ह्य़ातील जुना व मोठा तालुका. घनदाट जंगलाचे वरदान लाभलेल्या या भागात २५-३० वर्षांपूर्वी नक्षलवादी चळवळीने मूळ धरले होते. या भागाला उत्तमराव राठोड यांच्यासारखा सक्षम व विधायक दृष्टीचा लोकप्रतिनिधी दीर्घकाळ लाभला तरी पायाभूत सुविधा, किमान चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा याबाबतीत शासन व्यवस्थेकडून परवड झाली. डॉ. गद्रे हे जसे या भागात आलेले पहिले एमडी डॉक्टर होते, तसेच डॉ. बेलखोडे हे किनवटमध्ये आलेले पहिले शल्यविशारद (सर्जन) अशीही नोंद आहे. रुग्णालय सुरू केल्यावर भूलतज्ज्ञ उपलब्ध नव्हता, तेव्हा डॉ. बेलखोडे यांनी स्वत: भूलशास्त्रातील आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन प्रश्न सोडविला. प्रारंभीच्या काळात लोकांचा, रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी या रुग्णालयाला बऱ्याच दिव्यांतून जावे लागले; पण कितीही अडचणी आल्या तरी किनवट सोडायचे नाही, असे वचन त्यांनी बाबा आमटे यांना आधीच दिले होते. हळूहळू ते व त्यांचे रुग्णालय स्थिरावले.

या रुग्णालयाची सध्याची इमारत उभी करताना विश्वस्तांना कोणत्याही बँकेच्या कर्जाच्या कटकटीत अडकावे लागले नाही. ‘भारत जोडो अभियाना’तील बेलखोडे यांचे एक सहकारी मोहन पटवर्धन यांनी त्या काळात त्यांच्या एका संस्थेच्या माध्यमातून बिनव्याजी १० लाख रुपये उपलब्ध करून दिले, हा एक सुखद अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. (नंतर ही रक्कम त्यांना टप्प्याटप्प्यात परत करण्यात आली.) तत्कालीन मंत्री पतंगराव कदम, उद्योजक श्रीकांत भोगले, जवाहर गांधी, टी. एन. विश्वनाथन, विजयअण्णा बोराडे, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अविनाश येळीकर अशा अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या माध्यमांतून मदत केल्यामुळे हे रुग्णालय आवश्यक त्या सामग्री व उपकरणांनिशी उभे राहिले. डॉ. अहंकारी यांच्या संस्थेच्या माध्यमातून क्ष-किरण यंत्र, तर  नाम फाऊंडेशनमुळे डायलिसिस यंत्रसुविधा प्राप्त झाली. वैद्यकीय सेवा किंवा रुग्णालय म्हणजे एक मोठय़ा उलाढालीचा व्यवसाय, असे चित्र गेल्या दोन-तीन दशकांत ठळक होत गेले; पण बेलखोडे व त्यांच्या रुग्णालयाने किनवटसारख्या ठिकाणी त्यात सामाजिक भान आणि सेवाभाव जोपासताना ‘किमान नफा-ना तोटा’ हे सूत्र सांभाळले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा दाई प्रशिक्षण, आरोग्य मित्र व रुग्ण साहाय्यक या अभ्यासक्रमांचे संचालन करून रुग्णालयाने आतापर्यंत १०० हून अधिक आदिवासी मुलींना रुग्णसेवेच्या बाबतीत प्रशिक्षित केले. त्यातील काही मुली तर आज याच रुग्णालयात काम करत आहेत. फिरोदिया ट्रस्ट व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांमुळे रुग्ण ने-आण करण्याची मोठी सुविधा किनवटला प्राप्त झाली. जिल्हा व राज्यपातळीवरील अनेक महत्त्वाचे व मानाचे पुरस्कार या रुग्णालयाला मिळाले आहेत.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

साने गुरुजी रुग्णालय, किनवट

साने गुरुजी रुग्णालय, माहूर रोड, किनवट, जि. नांदेड. किनवट शहरात मध्यवर्ती बसस्थानकासमोर मुख्य रस्त्यालगत रुग्णालयाची इमारत आहे.

‘भारत जोडो युवा अकादमी’

(Bharat Jodo Yuva Academy)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे  रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०११-२०६६५१५००