व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती वाढल्यामुळे नागझिरा आणि नवेगावबांध आता एकत्रित बघण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र, प्रकल्पात सफारीसाठी वाहनांची संख्या कमी होत असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत होता. पर्यटकांचा त्रास कमी करून त्यांना आकर्षति करण्याच्या दृष्टीने १४ सुसज्जित सफारी वाहन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. शिवाय, १०० प्रशिक्षित गाईड आणि प्रवेशासाठी, वाहनांकरिता ऑनलाईन बुकिंगचीही सोय करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे गोंदिया जिल्ह्य़ाची वेगळी ओळख निर्माण झाली. पट्टेदार वाघांसह इतर प्राण्यांचे दर्शन हमखास होणार म्हणून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात येतात. त्यांना येताना त्रास होऊ नये, याकरिता ऑनलाईन बुकिंग वेबसाईटवरूनही करता येते.
नागझिरा अभयारण्यात अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी आहेत. यात मुख्यत: वाघ, बिबट, हरीण, अस्वल, लांडगा, रानगवे, रानकुत्रे, मोर, रानकोंबडी आदींचा समावेश आहे. पर्यटकांना सफारीसाठी १४ नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन व माहिती देण्यासाठी नवेगावबांध येथे ३५, तर नागझिरा येथे ६५ गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे.
वन्यप्रेमींना छायाचित्रणासाठी प्रती कॅमेरा शंभर रुपये, तर व्यावसायिक छायाचित्रकारांकडून ५०० रुपये फेरी, अशी आकारणी करण्यात आली आहे. चित्रीकरणासाठी २५० रुपये प्रती फेरी आणि व्यावसायिकांकडून प्रती कॅमेरा ७०० रुपये एका फेरीमागे आकारण्यात येत आहे. अनिवासी भारतीयांसाठी प्रती कॅमेरा १ हजार रुपये आणि व्यावसायिकांसाठी १५०० रुपये, तसेच व्हिडिओ कॅमेरा प्रती फेरी ३ हजार रुपये, तर व्यावसायिकांसाठी ५ हजार रुपये प्रती फेरी, अशी आकारणी करण्यात आली आहे. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. तशी नोंदणीही पर्यटकांनी करून ठेवली आहे.