विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ४९ जणांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे छाननीनंतर आता या सर्व मतदारसंघात आता २४७ उमेदवार रिंगणात आहेत. निफाड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, कळवण मतदार संघात छाननीसाठी आलेले हरिभाऊ पवार (५४) यांचे हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ जागांसाठी ३१३ जणांनी ५३८ अर्ज दाखल केले होते. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेकांनी बंडाचे निशाण फडकावले. या अर्जाची छाननी प्रक्रिया सोमवारी पार पडली. उमेदवारांनी अर्ज भरताना केलेल्या करामती निदर्शनास आल्या. इगतपुरी तालुक्यात एका उमेदवाराने अर्जावर स्वाक्षरी केली नव्हती. उमेदवारीसाठी पक्षाचे अधिकृत पत्र जोडले नसल्याने अनेकांचे अर्ज बाद झाले. सूचक व अनुमोदकाची आवश्यक ती कागदपत्रे सोबत न जोडणे, २५ वर्षांची वयोमर्यादा पूर्ण नसताना अर्ज भरणे, छाननीवेळी अनुपस्थित राहणे, विहित मुदतीत कागदपत्रांची पूर्तता न करणे, पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज भरणे आदी कारणांस्तव हे अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सर्वाधिक ८ उमेदवारांचे अर्ज देवळाली मतदारसंघात अवैध ठरले. निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या अर्ज क्रमांक २६ मधील माहिती विहीत नमुन्यात भरली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. यावर दोन्ही बाजुंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मंगळवारी सुनावणी होणार आहे. छाननी अंती आता नांदगाव मतदारसंघात (२९), मालेगाव मध्य (१४), मालेगाव बाह्य (१२), बागलाण (१८), कळवण (८), चांदवड (१८), येवला (१७), सिन्नर (९), निफाड (११), दिंडोरी (१५), नाशिक पूर्व (२३), नाशिक मध्य (१७), नाशिक पश्चिम (२३), देवळाली (३१), इगतपुरी (२०) अशा एकूण २४७ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी बुधवार अंतीम मुदत असून बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, कळवण मतदार संघात छाननी प्रक्रियेसाठी दळवटहून आलेले हरिभाऊ पवार (५४) या उमेदवाराचे बसस्थानकावर हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. छाननी प्रक्रियेसाठी ते तहसीलदार कार्यालयात आले होते. परंतु, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बस स्थानकावर गेले. तिथे त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण, त्यांच्याकडे पक्षाचे अधिकृत पत्र नसल्याने छाननीत पवार यांचा अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2014 रोजी प्रकाशित
जिल्ह्य़ात ४९ जणांचे अर्ज अवैध
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ४९ जणांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे छाननीनंतर आता या सर्व मतदारसंघात आता २४७ उमेदवार रिंगणात आहेत. निफाड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
First published on: 30-09-2014 at 07:48 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 vidhan sabha candidates nomination cancelled in maharashtra