लोहा शहरातील मतदारांनी नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भरभरून प्रेम केले. आपणाकडे कोणतेही पद नसताना शहरातील चौफेर विकास होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहर मॉडेल बनवू, त्यासाठी आपली साथ हवी आहे. जनता हीच आपली ताकद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
शहरातील २ कोटी ४३ रुपयांच्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी चिखलीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव पाटील होते. जि. प. सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, पं. स. सभापती अनसूया वैजाळे आदी उपस्थित होते. चिखलीकर म्हणाले की, मतदारांचा अपघाती विमा काढणारी लोहा नगरपालिका ही राज्यातली पहिली ‘क’ नगरपालिका होय. सुप्रिया सुकन्या योजनेंतर्गत मुलगी जन्मास आल्यानंतर तिच्या नावावर ५ हजार रुपये बँकेत ठेवून १८व्या वर्षी तिला देण्यात येईल. जुना लोहा ते शिवाजी चौकाला जोडणाऱ्या कलालपेठ भागातील नदीवरील पुलाचे भूमिपूजन चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल आदी उपस्थित होते.