सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवेचे व्रत तसेच, समाजहितार्थ समाजकारण आणि राजकारणात उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवणा-या (कै.) डॉ. द. शि. एरम यांनी शारदा क्लिनिक हे लावलेले रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी असून, वैद्यकीय क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांनी शारदा क्लिनिक या प्रथितयश रुग्णालयाचे भव्य वास्तूमध्ये रूपांतर केले असून, येथे प्रगत तंत्रज्ञानाने वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या हायटेक हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जपानच्या टोकीयो मेडीकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जे. पी. बॅरॉन, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, श्रीमती शीला दत्तात्रय एरम, डॉ. सुभाषराव एरम, चिन्मय एरम, पुजा एरम, अतुल भोसले यांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की सेवाभावी वृत्तीने डॉ. डी. एस. एरम यांनी वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केला नाही. तर, सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा केल्यानेच लोकांच्या आग्रहामुळे पुढे ते समाजकारणात व राजकारणात सहभागी झाले असता, कराडकरांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांनी नगरपालिकेत उत्तम कार्य साधले. राजकीय जीवनात त्यांनी मला केलेले सहकार्य हे मी कदापीही विसरू शकत नाही. शारदा क्लिनिकच्या रूपाने त्यांच्या या स्मृती मोलाच्या असून, त्यांनी अर्बन बँकेच्या माध्यमातून केलेले कार्य व आयुष्यभर सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहून एक कतृत्वसंपन्न जीवन साकारले. तोच आदर्श त्यांच्या भावी पिढय़ा साकारत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
जे. पी. बॅरॉन यांनी एरम कुटुंबीयांच्या समाजसेवेकरिता पाच लाखांची बॅरॉन एरम शिष्यवृत्ती जाहीर केली. डॉ. सुभाषराव एरम यांनी मनोगत व्यक्त केले.