हौशी रंगकर्मीना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून या वर्षी १५ नाटके होणार आहेत. यामध्ये १२ नाटके नागपूर केंद्रावरील असून ३ नाटके इंदूर केंद्राच्या वतीने होणार आहेत.
आठ रस्ता चौकातील सायंटिफीक सभागृहात ही नाटके सादर होणार आहेत. १७ नोव्हेंबरला नागपूरच्या आपला परिवार संस्थेचे गजानन पांडे लिखित ‘जस्ट अ गेम’, १८ नोव्हेंबरला अध्ययन भारतीचे नितीन नायगावकर लिखित ‘ऋतुस्पर्श, १९ नोव्हेंबरला अंकूर मानव समाज उत्थान केंद्राचे संजय जीवने लिखित ‘विठाबाईर्’, २० नोव्हेंबरला इंदूरच्सा अविरत संस्थेचे प्र.ल. मयेकर लिखित ‘मा अस सबीरन’ सादर होणार आहेत. २१ नोव्हेंबरला बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर लिखित ‘हिटलर की आधी मौत’, २३ तारखेला करुणा बहुउद्देशीय मानव कल्याण संस्थेचे प्रवीण खापरे लिखित ‘ब्रेक अपच्या वाटेवर’, २७ नोव्हेंबरला इंदूरच्या नाटय़भारती संस्थेचे श्रीराम जोग लिखित ‘डहुळ’ व १ डिसेंबरला इंदूरच्याच वेल न वेल पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे योगेश सोमण लिखित ‘केस नं ९९’ सादर केले जाईल. ही सर्व नाटके सायंकाळी ७ वाजता सुरू होतील.
स्पध्रेतील जी नाटके सकाळी ११.३० ला सुरू होतील त्यामध्ये २२ नोव्हेंबरला बोधी फाऊंडेशनचे सलीम शेख लिखित ‘कमेला’, २४ नोव्हेंबरला नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’, २५ नोव्हेंबरला महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा सांस्कृतिक मंडळाचे डॉ रंजन दारव्हेकर लिखित ‘घर हरवलेली माणसे’, २६ तारखेला मानवशांती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे ‘जस्ट अ‍ॅक्ट तीन सहा तीन’, २८ नोव्हेंबरला श्रीनाथ कृषी बहुउद्देशीय संस्थेचे स्वप्नील बोहटे लिखित ‘तो एक उंबरठा’, २९ ला स्वानंद सांस्कृतिक मंडळाचे डॉ माणिक वडय़ाळकर लिखित ‘क्षण एक पुरे’ व ३० तारखेला टिळकनगर महिला मंडळाचे सुनंदा साठे लिखित ‘आज ही कैकेयी’ नाटकांचे सादरीकरण होईल.