देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळत असल्याने नागपूरकरांना त्यांच्याकडून विशेष अपेक्षा असणे अत्यंत स्वाभाविक आहे. याशिवाय, वैदर्भीयांच्या अनेक अपेक्षांची फडणवीस यांना पूर्तता करावी लागणार आहे.  सर्वाधिक चर्चेत असणारा व दशकापासून रखडलेला मिहान प्रकल्प पूर्ण व्हावा अशी केवळ नागपूरकरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील प्रत्येकाची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर नव्या मुख्यमंत्र्यांनी ‘मेक इन विदर्भ’चा संकल्प घ्यावा, अशी अपेक्षा बाळगणे गैर ठरणार नाही. मोठे उद्योग आणत औद्योगिकीकरणाचा समतोल साधणे व मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यादृष्टीने त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. याकरिता विदर्भात सर्वत्रच चांगल्या पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागणार आहे. केंद्रात नितीन गडकरी यांच्याकडेच हे खाते असल्याने फडणवीस-गडकरी यांच्या समन्वयातून ही कामे व्हावी, ही वैदर्भायांची रास्त अपेक्षा राहणार आहे.  या शिवाय रखडलेला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा प्रश्न व जंगलविषयक कायद्यांमुळे संपूर्ण विदर्भात अडकलेली विकास कामे यांनाही त्यांना मार्गी लावावे लागणार आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्नाची दाहकता अद्याप कमी झालेली नाही व गेल्या दोन वर्षांतील लागोपाठच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलेल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून विशेष अपेक्षा राहणार आहे. सततच्या शिक्षणबाह्य़ अस्थिरतांना सामोरे जाणाऱ्या नागपूर व अमरावती विद्यापीठांचा दर्जा उंचावणे तसेच नव्याने स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाचा विकास करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.