देशात गेल्या चोवीस तासांमध्ये करोनाच्या ९७ हजार ५७० रुग्णांची भर पडली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन वाढ आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ४६ लाख ५९ हजार ९८४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात १,२०१ मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या ७७ हजार ४७२ वर गेली आहे.

करोना साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांचा पहिला एक लाखाचा टप्पा ६४ दिवसांनी गाठला गेला होता. आता जवळपास तेवढी रुग्णसंख्या चोवीस तासांमध्ये पार केली जात आहे.

देशात करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ८१ हजार ५३३ रुग्ण कोरानमुक्त झाले असून ९ लाख ५८ हजार ३१६ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या ३६ लाख २४ हजार १९७ झाली आहे. देशभरात रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७.७७ टक्के असून मृत्युदर १.६ टक्के आहे.

‘करोनाविरहित’ मानलेल्या जिल्ह्य़ांमध्ये ८.५ लाख बाधित

देशातील २३३ जिल्हे करोनामुक्त मानले जात होते. या जिल्ह्य़ांमध्ये आतापर्यंत एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, सीरो सर्वेक्षणात या जिल्ह्य़ांमध्ये किमान ८.५६ लाख लोक करोनाबाधित झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोनाचा पहिला रुग्ण भारतात आढळल्यानंतर दोन महिन्यांनी, म्हणजे मे महिन्यामध्ये देशव्यापी सीरो सर्वेक्षण करण्यात आले होते. रुग्णविरहित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये ८.५६ लाख, अल्प प्रमाणात रुग्ण आढळलेल्या जिल्ह्य़ांमध्ये १८.१७ लाख, मध्यम प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये १५.१८ लाख आणि जास्त प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्य़ांमध्ये २२.७६ लाख नागरिक करोनाबाधित झाले होते. त्यामुळे देशात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये अजून तरी करोनाचा फार प्रादुर्भाव झाला नसल्याचे जे दावे केले जात होते, ते या सीरो सर्वेक्षणात फोल ठरले आहेत.

महाराष्ट्रात २२ हजार नवे रुग्ण

मुंबई  :  गेल्या २४ तासांत राज्यात २२,०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ३९१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांवर गेली असून, रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यात आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दिवसभरात १३,४८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७०.२ टक्के  आहे. राज्यात आतापर्यंत १० लाख ३७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले तर २९,११५ जणांचा मृत्यू झाला.

दिवसभरात पुणे १९७१, पिंपरी-चिंचवड १२९४, उर्वरित पुणे जिल्हा १४४१, नाशिक शहर ११७४, सोलापूर ६८९, सातारा ८३७, कोल्हापूर ७३८, सांगली शहर ९१४, नागपूर जिल्हा १९०० याप्रमाणे नवे रुग्ण आढळले.