करोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यांमधू स्वत:च्या राज्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी बिहारमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटवरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समस्तीपूरा जिल्हातील कररख गावातील क्वारंटाइन केंद्रावर मजुरांच्या मनोरंजनासाठी चक्क महिला डान्सर्सला बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता यासंदर्भातील चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परराज्यांमधून आलेल्या मजुरांना कररख गावातील शाळेमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. उत्क्रमित माध्यमिक विद्यालय नावाच्या शाळेतील या सेटंरमध्ये सोमवारी (१८ मे २०२०) काही महिलांना नाचण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या मजुरांच्या मनोरंजनासाठी या डान्स करणाऱ्या महिलांना बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमातील व्हिडिओ आता व्हायरल झाले असून प्रशासनावर सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. एकाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रमाणे तयारी करुन अगदी रोषणाईवगैरे करुन या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत आहे. शाळेसमोरच्या स्टेजवर काही महिला नाचतानाही या व्हिडिओत दिसत आहेत. तर मैदानात बसलेले परराज्यातून आल्याने  क्वारंटाइन करण्यात आलेले मजूर हा कार्यक्रम पाहताना दिसत आहेत.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. याबद्दल एएनआयशी बोलताना, “या प्रकरणाची आम्ही दखल घेतली असून यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. आम्ही त्या ठिकाणी टीव्हीची व्यवस्था केली आहे. मात्र बाहेर लोकांना आणून तेथे मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याला आम्ही कोणताही परवानगी दिलेली नाही,” असं अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहारमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असून गुरुवारी (२१ मे २०२०) दुपारपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १८०० च्या वर पोहचली आहे.