02 March 2021

News Flash

रविवारी सूर्यग्रहण : महाभारत घडलं त्या कुरूक्षेत्रावरून कंकणाकृती दर्शन, मुंबईतून दिसणार खंडग्रास

चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही.

In this photo below, a bird flies during the solar eclipse in Bangkok, Thailand December 26, 2019. (Image: REUTERS)

रविवारी दि. २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे महाभारत युद्ध झाले त्या कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

कुरुक्षेत्रावरून कंकणाकृती दर्शन !
या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की ,खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच ‘ कंकणाकृती ‘ अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. विशेष म्हणजे जिथे महाभारत युद्ध झाले त्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दिसणार आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. कुरुक्षेत्र हे महान तीर्थक्षेत्र असल्याने तेथील ब्रह्मासरोवरावरावर तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्य सरकारला तेथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

मुंबईतून खंडग्रास दर्शन !
मुंबईतून रविवार दि. २१ जून रोजी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतू मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल अशी आशा खगोलप्रेमीना वाटत आहे. असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुणे येथून सकाळी १०-०३ ते दुपारी १-३१, नाशिक येथून सकाळी १०-०४ ते दुपारी १-३३, नागपूर येथून सकाळी १०-१८ ते दुपारी १-५१ , औरंगाबाद येथून सकाळी १०-०७ ते दुपारी १-३७ यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल, असेही ते म्हणाले.

सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचाच वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहतांना योग्य फिल्टरचा वापर करावा.हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.  यापूर्वी मागीलवर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ रोजी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 2:18 pm

Web Title: solar eclipse 2020 when and where to watch solar eclipses this year nck 90
Next Stories
1 ‘आता पुढील कारवाई लष्कराकडून’, किम जोंगच्या बहिणीचा दक्षिण कोरिया विरोधात युद्धाचा इशारा
2 मध्य प्रदेश : लग्न झाल्यानंतर अर्ध्या तासात विवाहीतेने नदीत मारली उडी, तपास सुरु
3 “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”; आईन्स्टाईन यांचं वाक्य शेअर करत राहुल गांधींची मोदींवर टीका
Just Now!
X