भारताने हाँगकाँगविरुद्ध सलामीच्या सामन्यात रडतखडत २६ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारताने ५० षटकात २८५ धावा केल्या. मात्र या धावांचा बचाव करताना भारतीय संघाची दमछाक झाली. हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत रोहितला २३ धावा करता आल्या. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. पण आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला विराटचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांत २०६ धावा केल्या आहेत. त्यात १८३ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. विराटचा हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला अवघ्या तीन धावांची आवश्यकता आहे. त्याच्या नावावर पाच सामन्यांत २०४ धावा आहेत. त्याची ६८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी १६२ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (१७९) तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हाँगकाँगसारख्या दुबळ्या प्रतिस्पर्धीसमोर रोहितच्या नेतृत्वाची कसोटी लागली आणि भारताने हा सामना २६ धावांनी जिंकला. त्यामुळे पाकिस्तानचा सामना करण्यासाठी रोहितला बळ मिळाले आहे.

कोहलीने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा रोहित युवा खेळाडूंची योग्य सांगड कशारीतीने घालतो, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १२९ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी भारताला ७३ सामन्यांत नमवले असून भारताने ५२ लढतीत विजय मिळवला आहे. उर्वरित चार सामने अनिर्णीत राहिले आहेत.