scorecardresearch

IND vs SL: “नो बॉल न टाकणे गोलंदाजाच्या ताब्यात असते…”, माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी अर्शदीपवर डागली तोफ

श्रीलंकेने गुरुवारी पुण्यात झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा १६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यातील अर्शदीपच्या नो बॉलवर सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.

IND vs SL: “नो बॉल न टाकणे गोलंदाजाच्या ताब्यात असते…”, माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी अर्शदीपवर डागली तोफ
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मालिकेतील दुसरा टी२० सामना गुरूवारी (५ जानेवारी) खेळला गेला. पुण्यात झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. हा सामना पाहुण्या संघाने १६ धावांनी जिंकला. हा सामना भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यासाठी एक न विसरणारा क्षण ठरला आहे. त्याने टाकलेल्या असंख्य नो-बॉलमुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले असून काहींनी सोशल मीडियावर त्यांचा राग व्यक्त केला आहे. त्यात भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी देखील अर्शदीप सिंगचा खरपूस समाचार घेतला आहे.

दुसऱ्या टी२० सामन्यात पुण्यात श्रीलंकेकडून भारताच्या पराभवामागे गोलंदाजांची खराब कामगिरी हे प्रमुख कारण होते. संघाच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात ७ नो बॉल टाकले, त्यापैकी ५ अर्शदीप सिंगच्या नावावर आहेत. श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्याच षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने अर्शदीपकडे चेंडू सोपवला. या षटकात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने सलग ३ नो बॉल टाकले. या सामन्यात त्याने एकूण ५ नो बॉल टाकले आणि २ षटकात ३७ धावा दिल्या. शिवम मावी आणि उमरान मलिक यांनीही १-१ नो बॉल टाकला. यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: IND vs SL: रोहित शर्मा-विराट कोहली टी२० संघातून बाहेर? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले संकेत

सुनील गावसकर अर्शदीप सिंगवर भडकले

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले, “तुम्ही व्यावसायिक क्रिकेटर म्हणून अशी घोडचूक करू शकत नाही. आपण बर्‍याचदा ऐकतो की आज खेळाडू म्हणतात की ‘गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, परंतु नो बॉल टाकणे हे आपल्या नियंत्रणात नाही’ असे होऊच शकत नाही. गोलंदाजी करताना चेंडू टाकल्यानंतर काय होते, त्यानंतर फलंदाज काय करतो हा वेगळा मुद्दा आहे. नो बॉल टाकू नये हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. तिथे संपूर्णपणे गोलंदाजाची चूक आहे.”

सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याही नो बॉलमुळे नाराज दिसत होता. तो सामन्यानंतर म्हणाला, “या परिस्थितीत अर्शदीपसाठी खूप कठीण आहे. पण कोणत्याही फॉरमॅटमध्ये नो बॉल फेकणे हा गुन्हा आहे. भविष्यात ही चूक होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. यापूर्वीही त्याने नो बॉल टाकले आहेत.”

हेही वाचा: IND vs SL 2nd T20I: अर्शदीपच्या चौथ्या नो-बॉलवर हार्दिक पांड्याचा चेहरा झाला लालबुंद; राग लपवण्यासाठी झाकला चेहरा, Video व्हायरल

दिनेश कार्तिकने अर्शदीप सिंगची घेतली बाजू

अर्शदीप सिंगने या दोन षटकांत ३७ धावा दिल्या. श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २०६ धावा केल्या. टीम इंडियाला २० षटकात ८ गडी गमावून केवळ १९० धावा करता आल्या आणि १६ धावांनी सामना गमावला. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अर्शदीपच्या बचावासाठी ट्विट करत म्हटले की, “अर्शदीप सिंगसाठी वाईट वाटत आहे. सामना सरावाच्या अभावाचा हा परिणाम आहे. दुखापतीनंतर एकदम पुनरागमन करणे हे कधीच सोपे नसते.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या