सोमवारी राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव करून सहा सामन्यांमध्ये चौथा विजय नोंदवला. हा सामना जोस बटलर आणि युझवेंद्र चहलच्या कामगिरीसाठी ओळखला जाईल. बटलरने मोसमातील दुसरे शतक झळकावले, तर चहलने पाच बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासात एका गोलंदाजाने एका सामन्यात पाच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, सामन्यादरम्यान कोलकाताचा फलंदाज अॅरॉन फिंच आणि राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसीध कृष्णा यांच्यात थोडी बाचाबाची झाली.

अॅरोन फिंच आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील लढत सध्या चर्चेत आहे. २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने आरोन फिंच आणि श्रेयस अय्यर यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर ९ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या. नवव्या षटकाच्या पाचव्या बॉलवर कृष्णाने राजस्थानला यश मिळवून त्याने ऍरोन फिंचला करुण नायरकडे झेलबाद केले.

कोलकाताचा संघ राजस्थानकडून २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. संघाने ८.३ षटकात एकही विकेट न गमावता १०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर कृष्णाने फिंचला झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फिंच आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना कृष्णा त्याला काहीतरी बोलताना दिसला. यानंतर फिंचनेही तेथे कृष्णाला उत्तर देण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघांचा स्लेडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फिंचने २८ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. फिंच आणखी काही काळ क्रीजवर राहिला असता, तर कोलकाताला हा सामना जिंकता आला असता. राजस्थानच्या २१७ धावांना प्रत्युत्तर देताना चहलच्या घातक गोलंदाजीसमोर कोलकाताचा संघ १९.४ षटकांत सर्वबाद २१० धावांवर आटोपला.

श्रेयस अय्यरची खेळी वाया गेली

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने पाच गडी गमावून २१७ धावा केल्या. जोस बटलरने ६१ चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह १०३ धावा केल्या. याशिवाय संजू सॅमसनने ३८ आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. कोलकाता नाईटकडून सुनील नरेनने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १९.४ षटकांत २१० धावांत गुंडाळला गेला. कर्णधार श्रेयस अय्यरने ८५ आणि अॅरॉन फिंचने ५८ धावांचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने ४० धावांत पाच बळी घेतले. त्याचवेळी, ओबेद मॅकॉयने आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट मिळवल्या.