चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नईला पोहोचला आहे. चेन्नई विमानतळावरील त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. धोनीच्या आधी सीएसकेचे स्टार खेळाडू रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा आणि ऋतुराज गायकवाड देखील चेन्नईला पोहोचले आहे

आयपीएलच्या या हंगामाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम करोनामुळे २९ सामन्यांनंतरच पुढे ढकलण्यात आला. उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स १३ किंवा १४ ऑगस्टला यूएईला रवाना होईल. मात्र या तारखांवर अद्याप अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेले नाही.

 

 

 

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. हा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल आणि अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होईल. या २७ दिवसांमध्ये एकूण ३१ सामने खेळले जातील.

हेही वाचा – VIDEO : धोनीच्या ४२ वर्षीय गोलंदाजाचा धुमाकूळ..! स्पर्धेतील घेतली पहिली HAT-TRICK

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज

पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४वे सत्र ४ मे रोजी तहकूब करण्यात आले. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्‍या स्थानावर आहे.