साधारणपणे दिवसातील सहा किंवा सहापेक्षा जास्त तास जे लोक बसून किंवा झोपून काढतात, त्यांची जीवनशैली बैठी जीवनशैली समजली जाते. मानवी शरीर हे दोन पायांवर तोलून धरण्यासाठी बनलेलं आहे. ताठ म्हणजे अपराइट स्थितीत शरीरातील अवयव त्यांची कार्ये जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. हृदय, फुफ्फुस, इत्यादी अवयव तसंच शरीराची उत्सर्जन व्यवस्था चालत्या फिरत्या शरीरात उत्तम प्रकारे काम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम

सलग खूप तास बसून राहण्याने पायाचे स्नायू अशक्त होत जातात कारण त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, रक्ताभिसरण मंदावतं. त्यामुळे पाय जड वाटणं, सुजणं अशा तक्रारी वाढतात. सलग बसण्याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम ग्लूटीअल स्नायूंवर होतो. सतत बसण्यामुळे या स्नायूंवर शरीराच्या वरच्या भागाचं वजन येतं आणि यामुळे हे स्नायू त्यांचं काम म्हणजेच चालताना शरीराला स्थिर ठेवणे आणि कंबरेच्या मणक्यांना स्थिर आधार देणे ही कामे करू शकत नाहीत. म्हणूनच बैठे काम करणाऱ्यांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण जास्त असतं.

हेही वाचा : पुरुषांनो, सतत मोबाइल वापरता? कायमस्वरूपी वंध्यत्व निर्माण होऊ शकते; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

वजन

व्यायाम केल्याने आणि चालतीफिरती जीवनशैली असल्याने आपण खातो ते अन्न, विशेषतः मेद आणि साखर यांचं व्यवस्थित आणि नियमित पचन होतं. बसून राहण्याने अन्न पचन परिणामकारकरीत्या होत नाही, त्यामुळे मेद आणि साखर शरीरात साठून राहतात आणि वजन वाढतं, हे वर्षानुवर्ष असंच सुरू राहिलं तर त्यातून स्थूलत्व येतं. शिवाय पोट फुगणं, बद्धकोष्टता, अॅसिडिटी हे त्रास सुरू होतात, आपली उत्सर्जन संस्था तिचं कार्य करु शकत नाही.

खुब्याचा सांधा आणि कंबर

खूप वेळ बसून राहिल्याने खुब्याच्या समोरचे म्हणजे मांडीच्या समोरच्या भागाचे स्नायू आकुंचन पावतात म्हणजेच त्यांच्या नेहमीच्या आकारापेक्षा आखूड होतात आणि मागच्या बाजूचे स्नायू गरजेपेक्षा जास्त ताणले जातात त्यामुळे या दोन स्नायूंमधला तोल बिघडतो. याचे परिणाम म्हणजे कंबरदुखी आणि खुब्याच्या समस्या वाढतात. बहुतेकवेळा एका जागी बसून काम करणारे लोक स्वतःच्या पोश्चरकडे फारसं लक्ष देत नाहीत, बहुतेकवेळा ते कामात इतके गर्क होऊन जातात की चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे कंबरेवर येणारा ताण त्यांच्या लक्षात येत नाही. वर्षानुवर्ष असंच सुरू राहिलं तर मणक्यांमधल्या गादीवर याचा ताण येतो, तिच्यातला ओलावा कमी होत जातो आणि वयानुरूप होणारे बदल हे वयाच्या बरेचसे आधीच दिसायला लागतात.

हेही वाचा : रताळे, पपई, संत्री आणि गाजर यांच्यात काय साम्य आहे, जो त्यांना सुपरफूड बनवतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर

नैराश्य येण्याची शक्यता

बैठी जीवनशैली आणि मनस्थिती यांचा दुहेरी संबंध आहे, नैराश्याने ग्रासलेले किंवा इतर काही मानसिक आजार असलेले रुग्ण बर्‍याच वेळा एका जागी बसून राहतात, दैनंदिन आयुष्यातली कामे, स्वतःची काळजी या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. बसून राहिल्याने किंवा शारीरिक व्यायाम आणि हालचाल न केल्याने आधीच असलेलं नैराश्य अजून वाढत जातं आणि मानसिक उदासीनता येते.

हेही वाचा : शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

याशिवाय बैठ्या जीवनशैलीमुळे वेरीकोस वेन्स, डीप वेनस थ्रोंबोसिस, डायबीटीस, आखडून गेलेले खांदे आणि मान यासारख्या आजारांचा धोका वाढतो. बहुतेक लोकांचं कामच बैठ्या स्वरूपाचं असल्याने त्यांना यातून काय मार्ग काढावा हे कळत नाही. पण यातून मार्ग निश्चितच आहे. ज्याप्रमाणे ध्रूमपान केल्यामुळे शरीराचं विविध प्रकारचं नुकसान होतं तसंच प्रदीर्घ काळ बसून काम केल्यामुळे शरीराला अनेक आजार जडतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why it is called as seating is new smoking hldc css
First published on: 23-01-2024 at 12:39 IST