१६ व्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात लोकांनी प्रचंड उत्साहाने मतदानात सहभाग घेतला. या पाचव्या टप्प्यात एकूण १२ राज्यांमधील १२१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. पश्मिच बंगालमध्ये सर्वात जास्त म्हणजे ८२ टक्के तर मध्य प्रदेशात सर्वात कमी म्हणजे ५४ टक्के मतदान झाले. पाचव्या टप्प्यासाठी १६ कोटी ६१ लाख मतदार मतदान करणार होते. कर्नाटक सर्व २८ जागांवर , राजस्थान (२०), महाराष्ट्र (१९), उत्तर प्रदेश, ओदिशा (प्रत्येकी ११), मध्य प्रदेश (१०), बिहार (७), झारखंड (६), पश्चिम बंगाल (४), छत्तीसगढ (३), जम्मू आणि काश्मीर, मणिपूर (प्रत्येकी १) जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात एकूण १७६९ उमेदवार होते.
राजस्थानात विक्रमी मतदान
राजस्थानात ६३.४३ टक्के मतदान झाले. आजवरच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान असून गंगानगरमध्ये सर्वाधिक म्हणजे ७२,७४ तर, जसवंत यांच्या उमेदवारीमुळे गाजलेल्या बारमेरमध्ये ७१ टक्के मतदान झाले. २००९ पेक्षा यंदा तब्बल १५ टक्के मतदान वाढले.
पश्चिम बंगालमध्ये गतवेळइतकेच मतदान
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात ४७ उमेदवार रिंगणात होते. २१ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानात खंड पडला होता. मात्र तेथील मतदानयंत्रे बदलल्यानंतर सुरळित मतदान झाले.
उत्तर प्रदेशात व बिहारमध्ये मतदान बेतानेच
उत्तर प्रदेशातील ११ जागांवर ६२.५२ टक्के तर बिहारमध्ये ५४.५० टक्के मतदान झाले. बिहारमध्ये ७ जागांवर मतदान होते. त्यात लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी प्रशासकीय अधिकारी आर.के.सिंह आदी उमेदवार रिंगणात आहेत. २००९ मध्ये झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी १५ टक्क्य़ांनी वाढली.
झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्याचे गालबोट
झारखंडमध्ये ६ जागांवर ६२ टक्के मतदान झाले. गुरुवारी झालेल्या मतदानातून १०६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र येथे एका मतदानकेंद्राजवळ माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवानांसह पाच जण जखमी झाले. तर, अन्य एका ठिकाणी मतदान केंद्रानजीकच कुकर बाँब निकामी करण्यात पोलिसांना यश आले.
कर्नाटकात मतदानाचा आकडा वाढताच
कर्नाटकात सर्वच्या सर्व म्हणजे २८ जागी मतदान झाले. गतवेळी झालेल्या ५८.८ टक्क्य़ांच्या तुलनेत यंदा ६६ टक्के मतदान झाले.येथे एकूण ४३५ उमेदवार रिंगणात असून २०१३ च्या विधानसभा निवडणुकीचा बदला घेण्यास भाजप उत्सुक आहे. मात्र येथे बेळगाव आणि टुमकुर येथे दोघा निवडणूक अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला.
ओदिशातही विक्रमी मतदान
११ लोकसभा आणि ७७ विधानसभा जागांसाठी ओदिशात मतदान झाले. लोकांनी बरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे येथील मतदानाची सरासरी ७० टक्क्य़ांवर गेली.
मणिपूर, छत्तीसगड व जम्मू-काश्मीर
मणिपुरातही मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक होता. येथे ७४ टक्के मतदान झाले. मात्र गतवेळच्या तुलनेत येथील आकडा ३ टक्क्य़ांनी घसरला. छत्तीसगडमध्ये गतवेळच्या तुलनेत ६ टक्क्य़ांनी वाढ होत ६३.४४ टक्के, तर जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी ६९ टक्के मतदान झाले.

मतदानाची टक्केवारी
* कर्नाटक (२८ जागा) – ६६ टक्के
* झारखंड (६ जागा) – ६२ टक्के
* प. बंगाल ( ४ जागा) – ८२ टक्के
* ओदिशा (११ जागा) – ७० टक्के
* छत्तीसगढ (३ जागा) – ६३.४४ टक्के
* मध्य प्रदेश (१० जागा) – ५४.४१ टक्के
* मणिपूर (१ जागा) – ७४ टक्के
* जम्मू- काश्मीर  (१ जागा) – ६९ टक्के
* राजस्थान (२० जागा) – ६३.२६ टक्के
* बिहार (७ जागा) – ५४.५०टक्के
* उत्तर प्रदेश (११ जागा) – ६२.५२ टक्के