देशात निवडणुका जाहीर झाल्यानंतर वेगवेगळय़ा ठिकाणी सुरू असलेले छापे, जप्तीची प्रकरणे हे सगळे व्यापारी व बँकांना त्रास देण्यासाठी सुरू आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचे हे जरा अतिच चालले असल्याने आपण निवडणूक आयोगाविरुद्ध तक्रार करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकलूज येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. धाडी टाकून पैसे जप्त करण्याच्या निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत त्यांनी या वेळी तीव्र नापसंती व्यक्त केली
निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली हा अतिरेक चालला आहे असा आरोप करून ते म्हणाले, की निवडणूक आयोगाचा आततायीपणा चालू आहे, त्यामुळे व्यापारी व उद्योजक यांना व्यवसाय करण्यात अडथळे येत आहेत. कायदेशीर कागदपत्रे असताना रकमा जप्त करून त्या दोन-दोन, तीन-तीन दिवस तपासाच्या नावाखाली अडकवून ठेवल्या जातात, त्याचा फटका बँका, उद्योजक यांना बसत आहे. धाडी टाकून पैसे ताब्यात घेण्याचे प्रकार व्यापारी व उद्योजकांना त्रास देण्यासाठी केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.
रिपाइं नेते जोगेंद्र कवाडे यांनीही निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतले असून, निवडणूक आयोगाच्या अनाठायी भीतीमुळे लोक मतदानाला येण्याचे टाळतील व त्यामुळे उमेदवारांच्या मताधिक्यावर परिणाम होईल असे आम्हाला वाटते. निवडणूक आयोग आचारसंहितेच्या नावाखाली अतिरेक करीत आहे यात शंका नाही.