News Flash

CoronaVirus Live Update: किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CoronaVirus/Lockdown Live Update: भारतासह जगभरातील करोनासंदर्भातील घडामोडी जाणून घ्या एकाच ठिकाणी

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा झगडत असल्या तरीही झपाटय़ाने होत असलेली नव्या रुग्णांची वाढ ही चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युसंख्या ११० झाली असून जगातील बळींची संख्या १ लाखांवर गेली आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत २१८ नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ झाली असून, दादरमधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना विषाणूची बाधा झाली. धारावीतील रुग्णांची संख्या वाढून २८ झाली. इंग्रजी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराला देखील करोनाची लागण झाली.

राज्यात शुक्रवारी करोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील करोनाबाधितांची संख्या १५७४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १८८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत,

Live Blog
21:09 (IST)11 Apr 2020
टाळेबंदीत अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य - छगन भुजबळ

देशात आणि राज्यात करोनामुळे मोठे संकट उभे राहिले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप आणि अन्नछत्र सुरू करण्यात आली आहे. या अन्नधान्य वितरण व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना(ओएमएसएस) योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

19:16 (IST)11 Apr 2020
पुण्यात तिघांचा मृृत्यू; मृतांचा आकडा २९ वर

पुण्यात आज करोनाने तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे पुण्यात आज २७ नव्या रूग्णांची वाढ झाली असून करोनाग्रस्तांचा आकडाही २३६ वर पोहोचला आहे.

19:10 (IST)11 Apr 2020
नवी मुंबईत करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

शनिवारी नवी मुंबईत करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली. दिवसभरात नवी मुंबईत करोनाचे दोन नवे रुग्ण सापडले. यानंतर करोनाग्रस्तांची संख्या ही आता ३५ वर पोहोचली आहे.

18:54 (IST)11 Apr 2020
महाराष्ट्र हे सर्वात जास्त करोना चाचण्या करणारं राज्य-राजेश टोपे

करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात जास्त आहेत कारण महाराष्ट्रात चाचण्या सर्वाधिक होत आहेत. ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती चांगली आहे. ५ टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हा कालावाधी आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी दिलं. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जातील असेही संकेत राजेश टोपे यांनी दिले.

17:45 (IST)11 Apr 2020
लॉकडाउन कधीपर्यंत वाढवायचा हे तुमच्या हातात, कारण... : उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीत आणि उपाययोजनांबाबत माहितीही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाउनचा कालावधी किंमान ३० एप्रिल पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली. तसंच लॉकडाउनचा कालावधी कधीपर्यंत वाढवायचा हे तुमच्या हाती आहे असं म्हणत सर्वांनी शिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

सविस्तर वाचा

17:32 (IST)11 Apr 2020
किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. सगळ्यांनी शिस्त पाळली, धीरोदात्तपणा दाखवला आहे त्याचं कौतुक आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

17:31 (IST)11 Apr 2020
… तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाउन कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन कायम राहील असे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी.

17:07 (IST)11 Apr 2020
आता आपण समोरुन रुग्ण येण्याची वाट पाहत नाही - उद्धव ठाकरे

आताआपण समोरुन रुग्ण येण्याची वाट पाहत नाही. आपण घरी जाऊन चाचण्या करतोय. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. १९ हजार चाचण्यांमध्ये एक हजार Covid-19 रुग्ण सापडले. त्यांच्यातील ६० ते ६५ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षण होती अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

16:12 (IST)11 Apr 2020
लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढणार, शिक्कामोर्तब बाकी!

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांचं मत जाणून घेतलं. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केली असून लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्यास संमती दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (सविस्तर वृत्त)

16:02 (IST)11 Apr 2020
उद्धव ठाकरे पाच वाजता जनतेशी संवाद साधणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाचवाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिवरुन पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते काय माहिती देतात ते महत्वाचे आहे.

15:55 (IST)11 Apr 2020
‘मुळशी पॅटर्न’च्या हिरोंचा तमाशा कलावंतांना मदतीचा हात

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे या बंदचा परिणाम साऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. या बंदचा परिणाम तमाशा कलावंतानादेखील बसला आहे. अनेक गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे तमाशा कलावंतांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे या कलावंतांच्या मदतीसाठी मुळशी पॅटर्न चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता प्रविण तरडे पुढे सरसावले आहेत. पुढे वाचा...

15:44 (IST)11 Apr 2020
भाभा रुग्णालयातील कर्मचारी महिलेला करोनाची बाधा

मुंबई येथील भाभा रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेला करोनाची बाधा झाली असल्याचे शुक्रवारी रात्री करोना चाचणीच्या अहवालानंतर स्पष्ट झाले.  संबंधित महिलेवर सध्या उपचार सूरु असून पनवेल पालिका क्षेत्रातील येथील कामोठे वसाहतीमधील ही महिला रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

15:14 (IST)11 Apr 2020
कधी खिडक्यांतून गप्पा, तर कधी नेटफ्लिक्सची मदत; वाचा करोना फायटर्सच्या गोष्टी

काही दिवसांपासून देशात करोनानं थैमान घेतलं आहे. एकीकडे देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत तर दुसरीकडे योग्य त्या उपचारानंतर काही करोनाग्रस्तांना त्यांच्या घरीही सोडण्यात आलं आहे. काही लोकं असे आहेत ज्यांनी करोनाविरूद्ध लढा दिला आणि बरे होऊन आज ते आपल्या घरीही गेले आहेत.

सविस्तर वाचा -

15:01 (IST)11 Apr 2020
पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला करोनाची बाधा

करोना विषाणूने जगभरासह देशभरात सध्या थैमान घातले आ्हे.  राज्यात देखील करोना बाधित रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई व पुणे ही प्रमुख शहरं यामध्ये अग्रस्थानी आहेत.  आज  तर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्‍यांच्या आईला करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे.

14:53 (IST)11 Apr 2020
पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन

देशभरात लॉकडाउन जाहीर केलेला असतानाही भाजपा आमदाराने नियमांचं उल्लंघन करत वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील या आमदाराच्या वाढदिवसाला १०० हून अधिक लोक उपस्थित होते. तुमकुरु जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत हा कार्यक्रम पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पोलिसांनीच आमदाराला सुरक्षा पुरवली होती. (सविस्तर वृत्त)

14:53 (IST)11 Apr 2020
लॉकडाउन असूनही प्रियकराशी लग्न करण्यासाठी ६० किमी चालत आली प्रेयसी

आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातील ही घटना आहे. हनुमान जंक्शन या ठिकाणी चितिकला भवानी ही १९ वर्षीय मुलगी राहते. तिच्या घरापासून ६० किमी अंतरावर तिचा प्रियकर साई पुन्नैय्या राहतो. साई पुन्नैय्या हा एदिपल्ली गावातला रहिवासी आहे. भवानी आणि साई यांचं मागील चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. आपल्या नात्याबद्दल या दोघांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी सांगितलं. मात्र दोघांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नाही. भवानीच्या कुटुंबीयांनी तर लग्नाला नकार दिला. त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी तशी योजनाही आखली. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे हे दोघे आपल्या घरांमध्येच अडकले. मात्र लॉकडाउनचे काही दिवस झाल्यानंतर भवानीने साईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ती ६० किमीची पायपीट करत साईच्या घरी पोहचली. या दोघांनी लग्नही केलं

14:45 (IST)11 Apr 2020
तुम्हाला कसे मारतो ते संपूर्ण जगाला दाखवणार, भारताचा पाकिस्तानला इशारा

भारतीय सैन्याने शुक्रवारी थेट पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅडसवर हल्ला चढवला. सैन्याने अत्यंत अचकू प्रहार केला, त्यामध्ये हे लाँच पॅड उद्धवस्त झाले. भारताने ही कारवाई करुन काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये शहीद झालेल्या पाच कमांडोंच्या मृत्यूचा बदला घेतला. वाचा सविस्तर बातमी

14:44 (IST)11 Apr 2020
धारावीत करोनाचा चौथा बळी, कस्तुरबा रुग्णालयात एकाचा मृत्यू

मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा एकीकडे झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढत आहे. आज कस्तुरबा गांधी रुग्णालयात एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृत्यू बरोबरच धारावीतील करोनाच्या बळींची संख्या चार झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माहिती मिळाली आहे.

13:53 (IST)11 Apr 2020
टाळेबंदी संपली तरीही लगेच उठणार नाहीत निर्बंध, सरकारी सूत्रांची माहिती

करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सध्या सुरू असलेली टाळेबंदी उठवली तरीही लगेच सारं काही आलबेल होईल असं नाही. ज्यावेळी लॉकडाउन उठवण्यात येईल त्यानंतर साधारणतः महिनाभर तरी राज्यातल्या प्रभावित ठिकाणी जमावबंदी लागू असेल आणि लोकांच्या मुक्त संचारावरही बंधने येतील असी चिन्हं आहेत.

याबाबत सरकार मधील उच्चपदस्थ सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉम ला माहिती दिली. या सूत्रांच्या म्हणण्यानुसार टाळेबंदी वाढणार अशी चिन्हं आहेत. अर्थात तसे करणे हे सध्याच्या परिस्थितीशी सुसंगतच आहे. ही बंदी उठवल्यावर साधारणपणे महिनाभर का होईना लोकांच्या मुक्त संचारवर वर बंधन ठेवावी लागतील असे ते म्हणाले.

13:47 (IST)11 Apr 2020
“देशभरातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवा”, केजरीवालांचा नरेंद्र मोदींना सल्ला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला जावा असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाउन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाउन वाढवला गेला पाहिजे असं मत मांडलं.

13:20 (IST)11 Apr 2020
बदलापूरमध्ये आढळले करोनाचे तीन रुग्ण

ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये करोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. पोलिसाची पत्नी (४५), मुलगी (२०) यांना कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन असताना साताऱ्याला नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते, तिथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. तर वोकहार्ट हॉस्पिटलच्या बदलापुरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला (वय २८) कोरोनाची लागण झाली आहे. तिघांना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

12:51 (IST)11 Apr 2020
करोना झाल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या

नाशिकरोड येथील चेहेडी पंपिंग स्टेशन येथील युवकाने करोना झाल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे

12:50 (IST)11 Apr 2020
मी असं काही म्हणालोच नाही, व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती तपासून पाहा: रतन टाटा

देशभरामध्ये कोरनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अनेक उद्योगपतींनी आणि सेलिब्रिटीजने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत निधी दिला आहे. टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनीही ५०० कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यानंतर लगेचच टाटा सन्सनेही एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. या आर्थिक मदतीबरोबर टाटा ग्रुप्सच्या माध्यमातून डॉक्टरांच्या जेवणाची आणि राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळेच इंटरनेटवर रतन टाटा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. याच मेसेजवर रतन टाटांनीच थेट ट्विटवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:49 (IST)11 Apr 2020
नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ वर, बेलापूर गावात एकाचा मृत्यू

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ वर पोहचली आहे. बेलापूर गावात एकाचा मृत्यू , मृत्यूनंतरच्या तपासणीत मृत व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह,. नवी मुंबईचा धोका वाढला. ग्रामीण भागात रुग्ण आढळल्याने खळबळ बेलापूर गाव सील करण्यास सुरुवात.

12:48 (IST)11 Apr 2020
महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे. (सविस्तर वृत्त)

11:47 (IST)11 Apr 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु झाली आहे. नरेंद्र मोदी या बैठकीत नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहेत. 

11:34 (IST)11 Apr 2020
महाराष्ट्र: राज्यात ९२ नवे रुग्ण, रुग्णांची एकूण संख्या १६६६ वर

महाराष्ट्रात करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा एक हजार ६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

11:05 (IST)11 Apr 2020
खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी काय घोडं मारलं आहे त्यांचा विमा का नाही ? पृथ्वीराज चव्हाण

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसप्रमाणे खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही केंद्र सरकारने विम्याचं सुरक्षा कवच दिलं पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. वाचा सविस्तर बातमी.

11:02 (IST)11 Apr 2020
भारतानं जीडीपीच्या १०० टक्के इतकं कर्ज काढायला हवं – पृथ्वीराज चव्हाण

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७० टक्के इतकं कर्ज आपला देश काढतो. अमेरिका १०० टक्के काढतो, तर जपान १६० टक्के काढतो. भारतानंही सध्याच्या परिस्थितीत देशाच्या जीडीपीच्या १०० टक्के इतकं कर्ज काढलं पाहिजे आणि करोनामुळे होत असलेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. वाचा सविस्तर बातमी.

11:02 (IST)11 Apr 2020
“माहिती लपवली तर हत्येचा गुन्हा दाखल करणार”, तबलिगीच्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

तबलिगी जमातच्या सदस्यांनी आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी असा आदेश छत्तीसगडमधील राजनंदगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तबलिगी जमातच्या सदस्यांनी १ मार्च २०२० पर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी असा आदेशच जिल्हाधिकारी जे पी मौर्या यांनी दिला आहे. आपल्या आदेशात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, जर संबंधित व्यक्तीने कोणतीही माहिती लपवली तर त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

10:57 (IST)11 Apr 2020
नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं – पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. “हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध निर्यात न करण्याचा निर्णय हा आधीच घेतलेला असणार. परंतू अमेरिकेला या औषधाची गरज भासली आणि त्यांनी नरेंद्र मोदींना दम दिला की, औषध द्या नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार रहा. आता खरं तर त्या दोघांना हे फोनवर गुपचूप हे करता आलं असतं, परंतु आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवण्यासाठी ट्रम्पनी ते जाहीरपणे केलं आणि मोदींनी मग त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं,” असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. (सविस्तर वृत्त)

10:48 (IST)11 Apr 2020
गुजरातमध्ये चिंता वाढली

गुजरातमध्ये करोनाचे ५४ रुग्ण सापडले आहेत. यासोबत करोनाबाधितांची संख्या ४३२ वर पोहोचली आहे.

10:13 (IST)11 Apr 2020
Coronavirus : धुळ्यात आज पहाटे एका महिलेचा मृत्यू

करोनामुळे धुळे येथे 22 वर्षीय महिलेचा आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाल्याची नोंद झाली.  मुळची मालेगाव येथील असलेल्या या महिलेचा करोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शिवाय तिला तीव्र अशक्तपणा आणि हृदयाच्या त्रास देखील होता. 7 एप्रिल रोजी धुळे येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते.

09:46 (IST)11 Apr 2020
लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर घातक परिणाम होतील, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (सविस्तर वृत्त)

09:45 (IST)11 Apr 2020
Coronavirus : राजापूर : करोनाबाधिताशी संपर्कातील व्यक्तीचा आजारपणाने मृत्यू

मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत व्यक्तीला काही काळ घरीच अलगीकरण करून  ठेवण्यात आले होते. त्याच्या स्वाबची चाचणी निगेटिव्ह  आली होती.

09:39 (IST)11 Apr 2020
Video: न्यूयॉर्कमध्ये केले जात आहेत सामूहिक दफनविधी

जगातील करोनाबळींच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा आकडा ओलांडला. अमेरिकेमध्येही कोरनाने थैमान घातलं आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत १७८३ लोक मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. येथे दररोज जवळपास ५०० जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळेच येथे मृतदेहांवर सामूहिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहे. याच संदर्भातील काही व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.येथे वाचा सविस्तर वृत्त

09:35 (IST)11 Apr 2020
१४ एप्रिलला लॉकडाउन संपणार का? नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. (सविस्तर वृत्त)

09:28 (IST)11 Apr 2020
Coronavirus : वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या 11 जणांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच जमावबंदीचेही आदेश दिलेले आहेत. हे आदेश मोडीत काढत पनवेल शहरात वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

08:58 (IST)11 Apr 2020
यवतमाळमध्ये करोना लक्षणे असलेल्या वृद्धाचा मृत्यू

गेल्या तीन, चार दिवसांपासून ताप, खोकला, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे १० एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता मेडिकल कॉलेज भरती झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री १.४५ वाजता मृत्यू झाला. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच त्यांचे नमुने घेण्यात येऊन करोना चाचणीकरिता नागपूरला पाठवले होते. अद्याप त्यांचा अहवाल यायचा आहे. गत तीन महिन्यापासून ते कुठेही गेले नसल्याचे तसेच आपल्या गावातच आठ जणांच्या कुटुंबासोबत राहत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

08:54 (IST)11 Apr 2020
Coronavirus : भारतात मृतांची संख्या २३९ वर

करोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूंची संख्या २३९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात १०३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासोबतच करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर गेली आहे.

08:45 (IST)11 Apr 2020
संतापजनक! करोना विलगीकरण कक्षातील गर्भवती महिलेवर बलात्कार

करोनामुळे देशभरामध्ये भीतीचे वातावरण असतानाच बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करोनाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या २५ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांना रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याने या महिलेचा बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

08:44 (IST)11 Apr 2020
गुजरातमध्ये हजारो कामगार रस्त्यावर; दगडफेक आणि जाळपोळ करत हिंसाचार

गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले होते. हे सर्व कामगार आपल्याला पगार दिला जावा याची तसंच पुन्हा घरी परतण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करत होते. यावेळी कामगारांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ केली तसंच दुकानांची आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. (सविस्तर वृत्त)

08:27 (IST)11 Apr 2020
Coronavirus : औरंगाबाद शहरात आणखी दोन करोनाबाधित, शहराचा आकडा 20 वर

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबाधितांचा एकुण आकडा आता 20 वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या एकाचा व रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या एकाचा समावेश असल्याचे सिव्हिल  सर्जन डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

07:50 (IST)11 Apr 2020
लॉकडाउनच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या कुटुंबाचा पुणे-मुंबई प्रवास

लॉकडाउनच्या काळातही वाधवान कुटुंबाने रितसर परवानगी घेत प्रवास केल्याने आधीच वाद निर्माण झाला असताना असाच अजून एक  प्रकार समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदाराच्या भावाने लॉकडाउनच्या काळात पुणे-मुंबई प्रवास केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी हा प्रवास केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नितीन भोसले यांच्याकडे प्रवासासाठी प्राताधिकाऱ्यांकडून पत्र मिळवलं होतं. हे पत्र दाखवूनच त्यांनी हा सगळा प्रवास केला. पण प्रांताधिकाऱ्यांनी आपण असं कोणतंही पत्र दिलं नव्हतं असं सांगितलं आहे. (सविस्तर वृत्त)

07:44 (IST)11 Apr 2020
अमेरिकेत एकाच दिवसात २००० जणांचा मृत्यू

अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत २०१८ मृत्यूंची नोंद झाली आहे. एकाच दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होणारा अमेरिका पहिला देश ठरला आहे. 

07:40 (IST)11 Apr 2020
करोना अद्याप तिसऱ्या टप्प्यात नाही!

देशात करोनाचा समूह संसर्ग होऊ  लागल्याचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा, तसेच ‘आयसीएमआर’च्या अहवालातील दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी फेटाळला. करोनाच्या प्रादुर्भावाचा तिसरा टप्पा अजून गाठलेला नाही. समूह संसर्गातून कोरानाचा फैलाव झालेला नाही. पण हा टप्पा टाळण्यासाठी टाळेबंदी तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिले.

07:12 (IST)11 Apr 2020
कळवा-मुंब्य्रात इमारतींना कुलूप

टाळेबंदीला गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी कळवा आणि मुंब्रा परिसरातील इमारतींचे प्रवेशद्वार कुलूपबंद करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या दोन्ही भागांतील करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ठाण्यातील खारकर आळी भागातील घाऊक धान्य बाजारपेठेतील शंभर व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावून सामाजिक अंतराचा नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.

07:12 (IST)11 Apr 2020
वसई-विरारमध्ये ३१ जणांना बाधा

वसईत शुक्रवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने करोनाबाधीत रुग्णांची संख्या ३१ वर गेली. यात विरार मधील एका पोलिसाचा तर वसईतील एका महिलेचा समावेश आहे. मिरा भाईंदर शहरातही एका रुग्णाची भर पडल्याने रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे.

07:11 (IST)11 Apr 2020
देशभरातील स्थिती..

करोना रुग्णांची एकूण संख्या शुक्रवारी ६,७६१ झाली असून एकूण मृत्यू २०६ झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १६,००२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नमुना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय ‘आयसीएमआर’ने घेतला आहे. १४ एप्रिलपर्यंत चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवून २.५ लाख नमुना चाचण्या घेण्यात येणार आहेत. जलद नमुना चाचण्यांची राज्यांना परवानगी देण्यात आली आहे.

टॅग : Coronavirus
Next Stories
1 मेक्सिको वगळता इतर देशांची तेल उत्पादन घटवण्यास मान्यता
2 नाणेनिधीच्या सल्लागार गटात रघुराम राजन यांचा समावेश
3 दैनंदिन वापरातील वस्तूंचे निर्जतुकीकरण करणारे यंत्र विकसित
Just Now!
X