चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी आपलं हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्यं टाळावीत असा सल्ला दिला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा निकालाच्या वेळी तुम्ही जामीनावर सुटला आहात, पश्चिम बंगालच्या निकालावर बोलू नका अशी तंबी दिली होती. परवा पण अशोक चव्हाण यांना तुमची औकात काय अशी तंबी दिली होती. अशी तंबी देणं त्यांना शोभत नाही. त्यांचं सध्या एक कार्टून आलं आहे ज्यामध्ये ते बेडवरुन पडलेत आणि झोपेत सरकार पडल्याचं म्हणत आहेत. आपलं हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्य टाळावीत,” असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले आहेत –
“अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.