औरंगाबादमधील मतदारांनी सक्तीची विश्रांती दिलेले माजी मंत्री राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे आता एका गौरवग्रंथाचे मानकरी झाले आहेत. अलीकडेच प्रकाशित झालेल्या या ग्रंथावर सोशल मीडियात अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच दर्डानी या ग्रंथातील आपल्या मुलाखतीत मराठवाडय़ातील पत्रकारितेचे ध्वजस्तंभ असा ज्यांचा गौरव झाला, त्या अनंतराव भालेराव यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे प्रकाशनानंतर या ग्रंथाने एका वादाला जन्म घातला आहे.
दर्डा यांच्या वृत्तपत्रसमूहात कार्यरत असलेले अतुल कुलकर्णी यांच्या कल्पनेतून-संपादनातून साकारलेल्या या ग्रंथाला ‘आमचं विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले आहे. त्यात या वृत्तपत्राची चाकरी केलेल्यांच्या स्तुतीपर लेखांचा भरणा करतानाच संपादकाने दर्डा यांची घेतलेली एक मुलाखतही समाविष्ट आहे. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना दर्डा यांनी अनंतरावांशी झालेल्या पहिल्या भेटीतील प्रसंग सांगताना ‘तुम्ही व्यापारी आहात, लुटायला आलात, यश मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या नावाचा वापर तुमच्या नावासोबत केला आहे..’ असे अनंतराव म्हणाल्याचे (पृ.क्र.१२६) नमूद केले. हा उल्लेख वाचल्यानंतर अनंतरावांचे पुत्र व प्रख्यात पत्रकार निशिकांत भालेराव यांना धक्काच बसला. आज हयात नसलेल्या एका व्यक्तीबद्दल असा खोडसाळपणा करणे अनुचित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नव्या वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी त्या काळात आमचा स्टेशनरी व छपाईवर २५ हजार रुपये खर्च झाला होता. परंतु अनंतरावांनी घेतलेल्या आक्षेपामुळे नावातील ‘मराठवाडा’ हा शब्द वगळावा लागल्याने सर्व छापील साहित्य रद्द करावे लागले, असे दर्डानी या मुलाखतीत सांगितले. हा सर्व उल्लेख वाचून अनंतरावांच्या चाहत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्यांची स्मृती जागवण्यासाठी कार्यरत असलेल्या नांदेडच्या दर्पण प्रतिष्ठानलाही दर्डाचा हा अगोचरपणा खटकला. त्याविरोधात मराठवाडय़ात निषेधाचा सूर निघेल की नाही, याबद्दल साशंकता असल्यामुळे ‘दर्पण’ने दर्डा यांना २५ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शविली आहे. अशी गांधीगिरी करण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नसल्याचे दर्पण प्रतिष्ठानचे गोिवद जोशी यांनी स्पष्ट केले.
आणीबाणीच्या काळात गोएंका यांनी दाखविलेल्या बेडर वृत्तीचा आजही गौरव केला जातो. दर्डावरच्या या नव्या पुस्तकात एक्स्प्रेस समूहात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या लेखात दर्डाची तुलना थेट गोएंका यांच्याशी केली आहे.

‘आमचं विद्यापीठ’ या पुस्तकाचे झोकदार प्रकाशन गेल्या रविवारी औरंगाबाद येथे झाले. प्रमुख पत्रकारांसह अनेक मान्यवरांनी या प्रसंगाचे साक्षीदार राहण्याचे जाणीवपूर्वक टाळले, असे दिसून येते. दर्डा यांना विद्यापीठ संबोधण्याची कल्पना अतुल कुलकर्णीचीच; पण समारोपात त्यांनी याच विद्यापीठाचे नामकरण ‘वर्कशॉप’ असेही केले आहे. हैदराबादचे दिवंगत लेखक-पत्रकार द. पं. जोशी यांनी फार पूर्वी अनंतराव ऊर्फ अण्णांचा उल्लेख ‘मराठवाडय़ाचा ध्वजस्तंभ’ असा केला होता. अण्णांच्या निधनास २५ वष्रे होत असताना त्यावर दर्डानी िशतोडे उडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर औरंगाबाद येथील एक चतुरस्र वाचक-पत्रलेखक सतीश कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या नावाला आक्षेप घेत, दर्डा हे जर विद्यापीठ असेल तर प्र. के.अत्रे, माडखोलकर, गोिवदराव तळवलकर, द. शं. पोतनीस, अनंत भालेराव, ‘संचार’कार वैद्य, माधव गडकरी, अरुण टिकेकर प्रभृतींना प्राथमिक शाळा म्हणायचे काय, असा सवाल सोशल मीडियावर एका ‘पोस्ट’द्वारे केल्यानंतर त्यावर मराठवाडय़ातून अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.