Ajit Pawar meeting with Amit Shah: महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा आणि मला मुख्यमंत्री पद द्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ठेवल्याचे वृत्त द हिंदू दैनिकाने दिले होते. या वृत्ताबद्दल आज अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “हे वृत्त धादांत खोटे आहे. मला याबद्दल काहीही माहिती नाही. आमची अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अमित शाह मुंबईत श्रीगणेश दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्त कांदा निर्यात, पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, किमान आधारभूत किंमत या प्रश्नांवर मी चर्चा केली.”

मैत्रीपूर्ण लढतीबाबत काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असा प्रस्ताव भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवला असल्याचेही द हिंदूच्या वृत्तात म्हटले होते. यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, या बातमीत काहीही तथ्य नाही. या सर्व थापा आहेत. जागावाटपाची चर्चा अजूनही सुरू आहे. सर्व जागांवरील चर्चा झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे जाहीर केले जाईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर महायुतीने ठेवलेला नाही, ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे, असेही अजित पवार म्हणाले.

हे वाचा >> ‘५६ इंचाची छाती आणि थेट देवाशी संबंध’, राहुल गांधी मोदींबद्दल अमेरिकेत काय म्हणाले…

“मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. आम्ही पूर्वी आघाडीत असतानाही अशा मैत्रीपूर्ण लढती कधीच केल्या नव्हत्या. एकदा का मैत्रीपूर्ण लढत करायची ठरवले तर नेमक्या कोणत्या जागावर मैत्रीपूर्ण लढावे, याचा वाद निर्माण होतो. तसेच त्याचा परिणाम इतर जागांवरही होत असतो. पण हा निर्णय शेवटी महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

मीच सांगितले माझा फोटो लावू नका

लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमधून भाजपाने अजित पवारांचा फोटो काढून टाकला आहे. याबाबतही अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मीच त्यांना माझा फोटो लावू नका म्हणून सांगितले. माझे फारच फोटो लागले आहेत. त्यामुळे ते कमी करण्यासाठी मीच सांगितले. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे तीनही पक्ष आपापल्यापरिने त्याची जाहिरात करत आहेत.

हे ही वाचा >> बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युगेंद्र पवारांना आशीर्वाद देणार का?

बारामतीमध्ये आज युगेंद्र पवार स्वाभिमान यात्रा काढणार आहेत. याबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, कोण काय करतो? याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. प्रत्येकजण त्यांच्यापरिने पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आता सगळ्यानांच आमदार व्हायचे आहे. तरूणांना वाटते आताच आपण आमदार झाले पाहीजे, वृद्धांना वाटते आपली ही शेवटची संधी आहे, त्यामुळे आपणच आमदार व्हायला पाहीजे. तर मधल्या लोकांना संधीची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुकांची गर्दी झाली आहे. लोकशाहीने सर्वांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार दिला आहे. शेवटी जनताच ठरवेल, असेही अजित पवार म्हणाले.