सांगली : देशातील दीड हजार बँकांमध्ये राजारामबापू बँकेने २० वा क्रमांक मिळवला असून, यामागे संचालकांची काटकसर, चोख व पारदर्शी कारभारच कारणीभूत असल्याचे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. इस्लामपूर येथे राजारामबापू सहकारी बँकेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. मध्यंतरी माझ्याकडे बघून काहींनी आपल्या बँकेत दोष शोधण्याचा प्रयत्न केला. ते बिचारे दमले, मात्र त्यांना काही दोष सापडला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर आदींसह संचालक, सभासद उपस्थित होते. या सभेत खेळीमेळीत चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
आ. पाटील पुढे म्हणाले, गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रिझर्व्ह बँकेचे निर्बंध वाढले असताना संचालक मंडळाने चोख व पारदर्शी कारभार करून संस्थेच्या प्रगतीत मोठे योगदान केलेले आहे. देशात अनेक बँका आल्या-गेल्या, काही बुडाल्या, काही बँकात इतके दोष निर्माण झाले की ते सोडविताना त्यांचा बराच काळ गेला. मात्र, आपल्या बँकेने संस्थेचा सभासद केंद्रबिंदू मानून कारभार केला आहे. माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी आभार मानले. संचालिका कमल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.